

इलियास ढोकले
नाते: रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन व विकास कामांबाबतची आढावा बैठक मंत्रालय येथे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आढावा बैठकीचे आयोजन केले, याबद्दल मंत्र्यांनी आभार व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांनी महिनाभरात सर्व संबंधित विभाग व तज्ञांशी चर्चा करून कामांची विभागणी, अडचणी व जबाबदाऱ्यांबाबत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.
या बैठकीत रायगड विकास प्राधिकरणामार्फत गडावर सुरू असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. रायगडसारख्या दुर्गम गडावर काम करताना येणाऱ्या अडचणी व मर्यादा मंत्री महोदयांसमोर मांडल्या.
प्राधिकरणास कोणत्याही प्रकारची स्वायत्तता नसून प्रशासकीय अधिकार नसल्याने केवळ सल्लागाराची भूमिका प्राधिकरणास पार पाडावी लागत आहे, याबाबत खंत व्यक्त केली.
यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांनी महिनाभरात सर्व संबंधित विभाग व तज्ञांशी चर्चा करून कामांची विभागणी, अडचणी व जबाबदाऱ्यांबाबत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले असून हा अहवाल सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पर्यटकांच्या मूलभूत सोयीकरिता पुरातत्व विभागाच्या अटी शर्थीनुसार व देखरेखीखाली प्राधिकरणाने गडावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे. ही स्वच्छतागृहे हस्तांतरित करून घेण्यास पुरातत्व विभाग चालढकल करत आहे. परिणामी गडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याविषयी सविस्तर वृत्तांत या बैठकीच्या निमित्ताने मांडला.
यावर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालिका यांनी ज्याअर्थी पुरातत्त्व विभाग गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणी करतो, त्याअर्थी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी देखील पुरातत्त्व विभागाची असल्याचे मान्य करित, लवकरच पुरातत्व विभाग याची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारेल अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पुरातत्व विभागाने ही जबाबदारी घ्यावी, असे यावेळी सूचित केले.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, छत्रपती घराण्याचा वारस म्हणून असलेली जबाबदारी व एक निस्सीम शिवभक्त या नात्याने दुर्गराज रायगडची आजवर अखंडपणे सेवा करत आलो आहे व यापुढेही करत राहीन. प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने रायगडावर सुरू असणाऱ्या कामांची दर महिन्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतो. या वयातही संपूर्ण गड पायी चढतो व उतरतो.
यादरम्यान प्रत्येक कामांची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देतो. वेळप्रसंगी काम दर्जेदार न झाल्यास व कामात दिरंगाई झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाईची देखील शिफारस केलेली आहे. महाड ते रायगडपर्यंत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल संबंधित पूर्वीच्या कंत्राटदारास केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून ब्लॅकलिस्ट केले आहे.
या वास्तूंचे संवर्धन करण्याची मंजूरी मिळावी यासाठी रायगड विकास प्राधिकरण गेली अनेक वर्षे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करित आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून याकरिता कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
या बैठकीस मंत्री भरत गोगावले, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचेसह सांस्कृतिक कार्य विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच रायगड विकास प्राधिकरणचे सदस्य सचिव, तज्ञ व अधिकारी वर्ग उपस्थित होते.