Mumbai Pune Expressway Pudhari
रायगड

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे टोल परतावा : 1.2 लाख वाहनधारकांना 5.16 कोटींचा दिलासा

खोपोलीजवळील गॅस टँकर अपघातानंतर 32 तासांच्या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना फास्टॅगद्वारे थेट परतावा

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : मुंबईपुणे एक्स्प्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. या घटनेदरम्यान टोल भरावा लागलेल्या सुमारे 1.2 लाख वाहनधारकांना एकूण अंदाजे 5.16 कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत देण्यात येणार असून संबंधित वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.त्याची प्रक्रिया सुरूही करण्यात आलीआहे.

3 फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ आडोशी बोगद्यानजीक प्रोपिलीन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने मोठा अपघात झाला. गॅस गळतीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली. यामुळे एक्स्प्रेसवे तसेच आसपासच्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

तब्बल 20 ते 22 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि 32 तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. हजारो प्रवासी रस्त्यावर अडकून पडले. अनेकांना अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सुमारे एक लाखांहून अधिक लोक या कोंडीत अडकले होते.

या कोंडीत केवळ पर्यटकच नव्हते, तर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, वृद्ध आणि लहान मुलेही अडकली होती. मुंबईकडे उपचारासाठी जाणाऱ्या काही रुग्णवाहिका तासनतास जागीच उभ्या राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांसाठी शौचालयाची किंवा सुरक्षित जागेची व्यवस्था नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

वाहतूक कोंडीची तीव्रता पाहून राज्य सरकारने टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही स्वयंचलित प्रणाली असल्याने तांत्रिक कारणांमुळे अनेक वाहनचालकांच्या खात्यातून टोलचे पैसे कापले गेले. त्यानंतर विविध स्तरांतून टोल परत करण्याची मागणी होत होती. याची दखल घेत ने परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

असा मिळणार परतावा

3 फेब्रुवारी रोजी एक्स्प्रेसवे तसेच पुणेबेंगळुरू महामार्गावरील टोल नाक्यांवर ज्यांच्या फास्टॅग खात्यातून टोल कापला गेला, त्या वाहनधारकांना हा परतावा मिळणार आहे. संबंधित वाहनांचा डेटा आयआरबीकडून मागवण्यात आला असून ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसांत हा परतावा थेट फास्टॅग खात्यात जमा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT