Mumbai Goa highway: Pudhari
रायगड

Mumbai Goa highway: नागोठणेनजीक महामार्गाचे काम कासवगतीने; पुलांच्या कामांमुळे वाहतूककोंडी सुरूच

राजकारण्यांच्या आश्वासनांनंतरही प्रवाशांचे हाल थांबेनात

पुढारी वृत्तसेवा

संतोष उतेकर

सुधागड: यावर्षी मे महिना संपण्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होणार नाही, असा शब्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच दिला आहे. मात्र, पळस्पे ते इंदापूर या 84 किमीच्या पहिल्या टप्प्यातील सद्यस्थिती पाहता, प्रशासकीय आश्वासने आणि जमिनीवरची वास्तविकता यात मोठी तफावत दिसून येत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार या संदर्भात माहिती दिली. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असा शब्द नितीन गडकरी यांनी दिला.

आधी देखील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते की, या महामार्गासाठी त्यांनी मोठी बदनामी सहन केली आहे, त्यामुळे ते उद्घाटनाला येणार नाहीत; मात्र मे अखेरपर्यंत रस्ता पूर्ण करून ते या रस्त्यावरून प्रवास करतील. दुसरीकडे, खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील आढावा बैठकीत 1 जूनपर्यंत माणगाव आणि इंदापूर बायपास सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले.

याबरोबरच माणगाव आणि इंदापूर बायपास वगळता उर्वरित महामार्ग आगामी मे 2026 पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली होती. दरम्यान, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे रखडलेल्या काही पुलांच्या कामांसाठी मात्र प्रवाशांना 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम अंतिम टप्प्यात असताना, कोकण रेल्वेचे विद्युत खांब या मार्गाच्या आड येत आहेत. हे खांब हटवल्याशिवाय बायपासचे काम पूर्ण होऊ शकत नाही. तसेच या दोन्ही बायपासचे काम देखील संपर्क तुम्ही सुरू आहे. यामुळे 31 मेची डेडलाईन हुकण्याची भीती व्यक्त होत आहे. जर 31 मे पर्यंत इंदापूर आणि माणगाव बायपास सुरू झाले नाहीत, तर पावसाळ्यात या शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरेल.

तसेच रस्त्यांच्या पॅचेसला आत्ताच तडे गेले आहेत. या शिवाय सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर मध्येच डांबराचे पॅच देखील मारण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ता निकृष्ट होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मे अखेर पुलांचे काम पूर्ण होणार का?

कोलाड, कोलेटी व नागोठणे येथील मोठ्या पुलांचे काम अजूनही संथ गतीने सुरु आहे. मे अखेरपर्यंत या पुलांची काम कसे पूर्ण होणार याबाबत शासंकता व्यक्त करण्यात येत आहे. या फुलांच्या कामामुळे येथे नियमित वाहतूक कोंडी होते त्याचबरोबर वाहतुकीचा वेग देखील मंदावतो त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे. या मार्गावर असलेल्या अनेक पुलांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT