जेएनपीए ः उरण तालुक्यातील प्रसिद्ध मोरा बंदर ते मुंबई भाऊचा धक्का दरम्यानच्या 75 कोटी खर्चाचे मोरा रोरो सेवेचे अनेक वर्षे रखडलेले काम आता एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा नवा मुहूर्त आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास जाणार आहे. मोरा मुंबई रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. आतापर्यंत या सेवेचे काम 50 टक्के पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अखत्यारीतील मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावर रोरो सेवेचे काम सुरू आहे. 75 कोटी खर्चाचे रोरो सेवेचे काम अनेक अडथळ्यांमुळे 2018 पासून कासव गतीने सुरू आहे. मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला वेग आला होता. सातत्याने होणाऱ्या या जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. यातील रेवस जेट्टीच्या कामात पाच कोटींच्या खर्चात वाढ झाली आहे. बोर्डाच्या माध्यमातून जेट्टीचे काम करण्यात येत आहे. या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.