उरणः रायगड जिल्ह्यात आणि विशेषतः उरण तालुक्यात महाविकास आघाडीला मोठा राजकीय तडा गेला आहे. नेहमी निस्वार्थीपणे सहकार्य करूनही पदरी फक्त दुर्लक्ष आणि मानहानीच आली, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. मनसे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा केली.
उरणमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. उरणमधील 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती जागांसाठी मनसेने आघाडीला पाठिंबा दिला होता. त्याबदल्यात मनसेला एक पंचायत समितीची जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि शेकाप यांनी आपापसात जागावाटप करून मनसेला रिक्त हस्ते ठेवले.
जागा न मिळूनही मनसेने पाठिंबा कायम ठेवला होता, परंतु प्रचारादरम्यान मनसे कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. केवळ पक्षाचा झेंडा वापरला गेला, पण कार्यकर्त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान दिले गेले नाही. आगामी निवडणुकीत मनसेची मते ही निर्णायक ठरतील.
मनसे आता महाविकास आघाडीच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत मनसेने आपली ताकद दाखवून देण्याचा निर्धार केला आहे.
भविष्यातील निवडणुकीत मनसे आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करेल आणि या निवडणुकीत आमची मतेच विजयी उमेदवार कोण हे ठरवतील,“ असा ठाम विश्वास ॲड. भगत यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे उरणच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, भाजपासह इतर पक्ष आता मनसेची साथ मिळवण्यासाठी काय हालचाली करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,मनसे पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचे बोलले जात आहे.
“आम्ही नेहमीच आघाडीचा धर्म पाळला, पण आम्हाला सातत्याने डावलले गेले. आमच्या कार्यकर्त्यांची मानहानी आम्ही सहन करणार नाही. भाजपा सहित ज्यांना मनसेचे सहकार्य हवे असेल, त्यांच्यासाठी आमची दारे खुली आहेत.“संदेश ठाकूर, जिल्हाध्यक्ष, मनसे रायगड