सुधागड ः संतोष उतेकर
मुंबई, ठाणे व पुण्याच्या वेशीवर असलेल्या रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिक पोटापाण्यासाठी कामानिमित्त मुंबई, पुणे व ठाणे या ठिकाणी तसेच गुजरात व इतरही काही ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. या स्थलांतरित नागरिकांची संख्या मोठी असून उमेदवाराच्या विजयासाठी महत्वाची आहे. म्हणूनच या सर्व स्थलांतरित मतदारांच्या संपर्कात उमेदवार, राजकीय पुढारी व कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भेटीगाठी व मनधरणी सुरू आहे. या स्थलांतरित मतदारांचा टक्का हा एखाद्या उमेदवाराला विजयासाठी महत्त्वाचा ठरतो.
या स्थलांतरित नागरिकांमुळे मतदानाच्या टक्क्यावर तेथील अनुकूल व प्रतिकूल परिणाम होतो. या स्थलांतरित नागरिकांना मतदानासाठी आणण्यास स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू आहे. आत्तापासूनच स्थलांतरित नागरिकांना संपर्क केला जात आहे. त्या ठिकाणी कबड्डी व क्रिकेट स्पर्धा आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थलांतरित नागरिकांपर्यंत अनेक उमेदवार राजकीय कार्यकर्ते पोहोचले आहेत. आणि या माध्यमातून आपणही तुमच्या संपर्कात आहोत आमच्याकडे लक्ष ठेवा अशा स्वरूपाची बोलणी सुरू झाली आहेत.
स्वतः उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते या स्थलांतरित नागरिकांच्या संपर्कात आहेत. प्रत्येक बूथ नुसार मतदार यादी चाळून नावे काढण्यात आली आहेत. आणि कोणता मतदार कुठे स्थलांतरित झाला आहे याची माहिती मिळवली जात आहे. ज्यांची माहिती हाती आली आहे. त्यांना संपर्क करून मतदानासाठी येण्याची विनंती केली जात आहे. ज्या स्थलांतरित नागरिकांचा पत्ता मिळत नाही आहे, त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि आव्हानात्मक बाब आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत विविध माध्यमातून संपर्क सुरू आहे.
या स्थलांतरित मतदारांवर भिस्त असल्यामुळे त्यांना खुश ठेवण्याकडे राजकीय पुढाऱ्यांचा कल आहे. मग मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा मतदानावेळी या मतदारांना त्यांच्या स्थलांतरित ठिकाणावरून आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येते. ा वेगवेगळ्या माध्यमातून येण्या-जाण्याची व्यवस्था व प्रयोजन देखील केले जाते. प्रवासादरम्यान भोजनाची व खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केली जाते. याबरोबरच त्यांना सुखरूप आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था देखील होते.
एका स्थलांतरित नागरिकाने सांगितले की पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते संपर्कात आहेत. मतदानासाठी येण्याची व्यवस्था व सोय केली आहे. कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मतदानासाठी गावी यावेच लागते. याशिवाय निवडणुकीच्या निमित्ताने त्या दिवशी इतर नातेवाईकांची व स्थानिक मित्रांची देखील भेट होते. कामानिमित्त बोरवली मुंबई येथे आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी आहे.
विधानसभा निवडणूक असल्यामुळे अनेक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते फोनवरून तसेच प्रत्यक्ष संपर्कात आहेत. मतदान करण्यासाठी सहकुटुंब गावी या असे सांगण्यात येत आहे. मतदानासाठी आवर्जून गावी जाणार आहे. असे रायगड जिल्ह्यातील मूळ माणगाव येथील एका रहिवाशाने सांगितले.
आदिवासी मतदारांवर लक्ष
रायगड जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा देखील आहे. येथील अनेक वाड्या-पाड्यातील आदिवासी बंधू भगिनी कामानिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. तर दिवाळीनंतर देखील अनेक आदिवासी वाड्यांवरून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. सद्यस्थितीत अनेक आदिवासी वाड्या पाड्यांवरील नागरिकांना मतदानासाठी येण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांच्या कामाची व खाण्यापिण्याची व्यवस्था स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते. तसेच जे स्थलांतरित आदिवासी मतदार आहेत त्यांना निवडणुकीच्या दिवशी आणण्याचे प्रयोजन केले आहे.