

कर्जत : कर्जत चार फाटा येथून खोपोली येथे जाण्यासाठी काही वर्षांपूर्वी कर्जत पळसदरी मार्गे हाळ - खोपोली या राज्य मार्गाचे काम एम एस आर डी सी च्या माध्यमातून करण्यात आले आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र पळसदरी या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला अद्यापि मिळालेला नसल्याने आम्हाला जमिनीचा मोबदला मिळणार तरी कधी असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
कर्जत पळसदरी दरम्यान रस्त्याची जागा संपादित केलेल्या काही शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या जागेत रस्ता करू दिला नाही परिणामी या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अचानक काही ठिकाणी रस्ता अरुंद होत असल्याने तथा रस्त्याचे दिशा बदलण्यात आल्याने यापूर्वी या परिसरात तील रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत आणि घडत सुद्धा आहेत.
या अपघाताच्या घटनांचा गांभीर्याने विचार करता ज्या शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही त्यांना त्वरित संबंधित विभागाने शासनाकडून मोबदला मिळवून द्यावा आणि त्यांच्या जागा ताब्यात घेऊन रस्ता सुस्थितीत परिपूर्ण वाहनधारकांसाठी खुला करावा अशी मागणी वाहनधारक तथा नागरिकांतून होत आहे.
खेदाची बाब म्हणजे हा रस्ता बनवल्यापासूनच वादाधित राहिला आहे. या रस्त्याची योग्य देखभाल सुद्धा ठेवण्यात आलेली नाही परिणामी या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे चुकवतानाही अपघात होत आहेत. उकडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून धूळ उडत आहे.
शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्याचा एक भाग डांबरीकरण, काँक्रीटीकरण करून देण्यास विरोध केला आहे. या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.तसेच पावसाळ्यात सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात झाले आहेत, तरी सुद्धा संबंधित अधिकारी गांभीर्याने याकडे लक्ष देत नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
हा मार्ग जागोजागी खंडित तसेच खड्डे पडल्यामुळे वाहन धारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कर्जत होऊन पुण्याला जाताना जवळचा सोयीस्कर असा मार्ग म्हणूनही या मार्गाकडे पाहिले जाते. कर्जत पळसदरी मार्गे खोपोली हे अंतर 17 किलोमीटरचे आहे.
शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा यासाठी संबंधित विभागाशी चर्चा सुरू आहे.
महेंद्र थोरवे, आमदार
शासन जर शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर जनतेचा शासनावरचा विश्वास उडून जाईल. पण यावर कोणत्याच नेत्याने लक्ष दिले नाही तर या विरोधात पळसदरी रस्त्यावर बसून उपोषण छेडून ये जा करण्याचा मार्ग बंद करून आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.
अमोघ कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्ते