म्हसळा तालुक्यात आंबा-काजू, सुपारी बागायत धोक्यात  AI photo
रायगड

Raigad News : म्हसळा तालुक्यात आंबा-काजू, सुपारी बागायत धोक्यात

बदलत्या हवामानामुळे बागायतदारांचे अर्थकारण बिघडणार

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यात काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तज्ज्ञांचा अंदाज तंतोतंत खरा ठरताना दिसत आहे. सतत ढगाळ वातावरण, तापमानवाढ, अवकाळी पाऊस अशा विविध तापमानवाढीचे दुष्परिणाम दिसुन येत आहेत.

या बदलत्या वातावरणाने आतापर्यंत उपजिविका आणि उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या कोकणातील आंबा, काजू, कोकम, सुपारी या फळबागांचे भवितव्य अंधकारमय दिसत आहे. त्यामुळे या बागांवर अवलंबुन असलेल्या बागायतदारांचे अर्थकारण बिघडताना दिसत आहे.

रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यातील अनेक नागरीकांचे अर्थकारण आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम या पिकांवर आहे, परंतु ही पिकेच बदलत्या वातावरणामुळे अडचणीत येताना दिसत आहेत. तालुक्यात सर्वाधिक लागवडक्षेत्र असलेला काजू आणि आंबा ही पिके सतत धोक्यात येत आहेत. मागील काही वर्षात आंबा, काजू पिकांचे निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले होते. नंतर तौक्ते वादळात अखेरच्या टप्प्यात असलेला आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आणि आता पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे राहिले आहे.

सध्या आंबा आणि काजूला मोहोर येऊन फळे येण्याची प्रकिया सुरू आहे. बागायतदार देखील पूर्ण क्षमतेने बागांमध्ये काम करीत असताना आता अवकाळीचे संकट उभे आहे. जिल्ह्यात पुढील दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यानुसार अवकाळी पावसाला सुरूवात देखील झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळी अवकाळी पाऊस यामुळे आंबा, काजुला आलेल्या मोहोराचे संरक्षण कसे करावे ? या चिंतेत बागायतदार आहेत. या वातावरणात दोन्ही फळपिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे.

ढगाळ वातावरण व अवकाळी पडणारा पाऊस यामुळे कीटकनाशकांच्या फवारण्यांचा खर्च देखील वाढणार आहे. अलीकडे कीटकनाशकाच्या वाढलेल्या दरामुळे बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. त्यातच बदललेल्या वातावरणामुळे फवारण्यांची संख्या देखील वाढणार आहे. सलग तीन - चार दिवस पाऊस पडल्यास आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान होणार असुन बागायतदारांचे पुढील अर्थकारण देखील बिघडणार आहे.

एकीकडे कोरोनामुळे मागील तीन वर्षे काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. आंबा, काजू, कोकम, सुपारी बागा धोक्यात असून मोहोर प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आंबा हंगाम लांबण्याची चिन्हे असून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी, बागायतदारांमध्ये चिंतेचे सावट आहे.

वीटभट्टी व्यवसायिक चिंतेत

अवकाळीचा फटका वीटभट्टी व्यवसायालाही बसत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे वीट वाळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून तयार वीटांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वीटभट्टी मालक व कामगार वर्ग आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांनी प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करावे अशी मागणी केली आहे. अवकाळी पावसाचा फटका लवकर थांबावा आणि हवामान पूर्ववत व्हावे अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

अवकाळी पावसाने आंब्याच्या झाडांवर आलेले मोहोर गळून पडले असून नवीन रोगाचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता आहे. तसेच काजू पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाकडून काहीतरी ठोस भरपाई मिळाली पाहिजे.
किरण पालांडे,कोळे, शेतकरी
म्हसळा तालुक्यात काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला असून आंबा, काजू बागायतदार यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही महिन्यांपासून वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपिक विमा योजना काढून ठेवावी जेणेकरून शेतकऱ्यांनी एखाद्या पिकासाठी केलेला खर्च निघून जास्तीत जास्त नुकसान होणार नाही असे आवाहन करण्यात येत आहे.
दत्तात्रय शिंदे,कृषी अधिकारी, म्हसळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT