Raigad District Water Crisis pudhari photo
रायगड

Raigad Water Crisis : म्हसळा तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली

मंत्री, खासदार यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; ठेकेदारांवर कारवाई होणार का?

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘हर घर जल’ अभियानांतर्गत जल जीवन मिशन योजनेतून म्हसळा तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, निधीअभावी काही योजनांची कामे संथ गतीने सुरू असून काही योजनांंचे काम निकृष्ट झाले आहे.

तोंडसुरे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णपणे ठप्प असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी रखडलेल्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि कामे सुरू न करणाऱ्या तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

म्हसळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाभरे धरणातील जलस्रोत निश्चित करण्यात आला आहे तर तोंडसुरे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेला खरसई धरण प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे तालुक्यातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र प्रत्यक्षात कामांची संथ गती आणि अडचणींमुळे या अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सदोष कामांचा फटका सर्वसामान्यांना

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या कामांत विविध त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. नियोजनातील त्रुटी, शासकीय यंत्रणेच्या कामातील चुका आणि ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने करण्यात आलेली कामे यामुळे काही योजना सदोष ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.परिणामी योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही अपेक्षित लाभ मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा कामांची तांत्रिक तपासणी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

तोंडसुरे योजनेचे काम ठप्पच

तोंडसुरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठकीत आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक निर्देश दिले होते. तरीदेखील या योजनेचे काम पूर्णपणे ठप्प असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कामे पूर्ण करण्याची मागणी

तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना पुन्हा निर्देश देऊन मंजूर योजनांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT