नेरळ-माथेरान टॉय ट्रेन 
रायगड

Matheran toy train resumes|'माथेरानची राणी' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुन्हा धावणार

मध्य रेल्वेकडून परिपत्रकाद्वारे माहिती; पर्यटकांसह व्यावसायिक सुखावले

पुढारी वृत्तसेवा

माथेरान : दरवर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारी पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन यावर्षी वेळेवर धावणार आहे. येत्या २० ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मिनी ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकातून माथेरानच्या दिशेने धावेल, अशी अधिकृत माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. मिनीट्रेन सूरु होत असल्याने पर्यटक प्रवाशांसह व्यावसायिकही सुखावले आहेत.

माथेरान परिसरात झालेल्या मुसळधार

पावसामुळे रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली होती. 'कड्यावरचा गणपती' परिसरात मोठे भूस्खलन झाले होते, तर 'वॉटर पाईप' स्थानकाच्या पुढे दरड कोसळल्याने ट्रॅकखालील भाग कमकुवत झाला होता. रेल्वे विभागाने या सर्व अडथळ्यांवर मात करत सुरक्षा भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यानंतर मालवाहू गाडी चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि आता अखेर प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिनी ट्रेनचे वेळापत्रक

नेरळ स्थानकातून पहिली गाडी सकाळी ८:५० वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये ११:३० वाजता पोहचेल. दूसरी गाडी सकाळी १०:२० वाजता सुटून दुपारी १:०५ वाजता माथेरानला पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी माथेरानहून पहिली गाडी दुपारी २:४५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ५:३० वाजता नेरळला पोहचेल, तर दुसरी गाडी सायंकाळी ४:०० वाजता सुटून ६:४० वाजता नेरळ येथे पोहचेल.

तिकीट दर आणि डब्यांची क्षमता

या ट्रेनच्या प्रथम श्रेणी एसी तिकिटाचा दर ३४० रुपये असून त्यात १६ प्रवाशांची व्यवस्था आहे, तर द्वितीय श्रेणीचे भाडे ९५ रुपये असून ३० प्रवाशांची आसन क्षमता आहे. एकूण तीन डब्यांची ही गाडी एका फेरीत ११० प्रवाशांना घेऊन धावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT