Waste Management Pudhari
रायगड

Waste Management: माथेरान नगरपालिकेतर्फे कचऱ्यापासून वीजनिर्मिती; कचऱ्यातून वीजनिर्मिती करणारे जिल्ह्यातील पहिले पर्यटन स्थळ

शंभर टक्के प्लास्टिकमुक्तीचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कदम

माथेरान: माथेरान शहरातील सर्व कचरा संकलित करताना ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करणारे रायगड जिल्ह्यातील पहिले पर्यटन स्थळ आहे. येथील रस्ते व शासकीय कार्यालयांना पुरवठा केला जातो. माथेरानमध्ये प्रदूषणमुक्त गाव राखण्याकरता अहोरात्र कचरा संकलनाचे काम कर्मचारी करीत असतात.

माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे येथे सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे मानवी श्रमाद्वारे केले जाते. माथेरान मध्ये दररोज 3 टन कचरा निर्मिती होते. यामध्ये 2 टन ओला व 1 टन सुका कचरा असतो.

कचरा संकलन करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी हाताने ओढणाऱ्या गाड्यांचा वापर केला जातो. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे यामुळे रिकाम्या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात तयार होत असून नगरपरिषदेमार्फत सर्व प्लास्टिक बॉटलचे संकलन करण्यात येते आणि त्यावर सेंटर येथे बेलिंग मशीन द्वारे प्रक्रिया करण्यात येते.

माथेरान नगरपरिषद हद्दीमध्ये निर्माण होणारा कचरा हा नगरपरिषदेमार्फत ओला व सुका अशा दोन प्रकारामध्ये विलगीकृत स्वरुपात जमा केला जातो. निर्माण होणारा सर्व ओला कचरा हा बायोगॅस प्रकल्प येथे पूर्णतः प्रक्रिया केला जातो.

तसेच सुका कचरा यामध्ये प्रामुख्याने रिकाम्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात असतात हा पुनः वेगवेगळ्या प्रकारात विलगीकृत करून बेलिंग मशीन द्वारे प्रक्रिया करून त्याचे गठ्ठे तयार केले जातात त्यानंतर नगरपरिषदेतर्फे निरोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे.

सदरील एजन्सी प्लास्टिक बॉटलचे तयार केलेले गट्टे घेऊन जातात. माथेरानमध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी असून वेळोवेळी तपासणी केली जाते. नगरपरिषदेद्वारे नियुक्ती केलेल्या पथकामार्फत प्लास्टिक बंदीबाबत वेळोवेळी पडताळणी करण्यात येत आहे.

प्लास्टीकचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करणेबाबत समज देण्यात येतो तसेच जनजागृती करण्यात येते. माथेरानमध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर कोणीही करीत नसून जर कोणी आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार दंडात्मक व उचित कारवाई करण्यात येते.

2007 मध्ये नगरपालिका प्रशासनाने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करून तिचा वापर सुरू केला अशा प्रकारचा प्रकल्प माथेरान मध्ये आज ही सुरू आहे व या विजेचा वापर पालिका प्रशासन सरकारी कार्यालयात व रस्त्यांच्या विजेसाठी करीत आहे.

माथेरानमध्ये कचरा संकलनासाठी ठेकेदारी पद्धतीने 60 कर्मचारी असून कायमस्वरूपी 27 कामगार आहेत यातील महिला कर्मचारी रोज घरोघरी जाऊन ओला व सुखा कचरा संकलित करीत असतात व स्थानिकांना घरोघरी किंआर कोड दिलेले आहेत त्याचाही वापर केला जातो.

येथील पारशी जिमखाना येथे कचरा संकलन केले जाते काहीवर्षांपूर्वी येथे कचऱ्याचे साम्राज्य होते परंतु तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या संकल्पनेतून हा परिसर शून्य कचरा विभाग म्हणून स्वच्छ करण्यात आला. येथील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करताना त्याचे खत बनवून येथील गार्डनमध्ये वापर केला गेला व आज या ठिकाणी मुलांकरता खेळाचे मैदान झाले आहे.

माथेरान प्लास्टिक व कचरामुक्त करण्याकरता विशेष अभियान सुरू केले असून मागील एक महिन्यापासून येथील प्रत्येक विभागामधील कचरा स्वच्छ करण्याकरिता कामगार नियुक्त करून स्वच्छता करण्यात येत आहे.
- चंद्रकांत चौधरी, नगराध्यक्ष, माथेरान
पावसाळ्यामध्ये माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विकले जाते जे येथील पर्यावरणाकरिता हानिकारक आहे. या प्लास्टिकच्या रेनकोटवर सरसकट बंदी आणली असून जो कोणी नियमांचा भंग करेल त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. माथेरान वाचवण्याकरता प्लास्टिक शंभर टक्के बंद होणे गरजेचे आहे.
- शिवाजी शिंदे, नगरसेवक, माथेरान
माझ्या नगराध्यक्ष काळात 2007 मध्ये बायोगॅस प्रकल्प सुरू करून ओला कचरा नष्ट करण्याचा प्रकल्प राबविला होता जो आजही सुस्थितीमध्ये सुरू आहे. असा प्रकल्प त्या काळात राबविणारी माथेरान पहिली नगरपालिका होती.
- अजय सावंत, माजी नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT