Matheran Rainfall Season
नेरळ : जून महिन्याच्या पहिल्या शनिवारी माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. जानेवारी महिन्या नंतर पहिल्यांदाच माथेरान मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी समाधान मानले आहे. दरम्यान, माथेरानला जाण्यासाठी नेरळमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली.
यावर्षी पावसाळी पर्यटनाच्या पहिल्याच आठवड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. शनिवारी सकाळपासून पर्यटक येऊ लागले होते. सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान माथेरान मधील पार्किंग फुल झाली होती. त्यामुळे घाटरस्त्यात मोठी ट्राफिक झाली होती. पर्यटकांचा ओघ वाढतच असल्याने, सकाळी ११ च्या दरम्यान नेरळ शहरात पर्यटक माथेरानच्या दिशेने येत असताना नेरळ मध्ये जिकडे तिकडे पर्यटक दिसत होते. तर दुपारी २ वाजे पर्यंत ९७६२ पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाल्याचे बोलले जात आहे.
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथून माथेरानमध्ये येण्यासाठी मिनिट्रेन शटल सेवा आणि ई रिक्षा असल्यामुळे माथेरान शहरात येण्यासाठी पर्यटक ई रिक्षाकडे आकर्षित झाले होते. ई रिक्षामध्ये बसण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एक दीड तासानंतर पर्यटकांचा नंबर लागत होता तरीसुद्धा पर्यटक रांगेमध्ये उभे होते. ई रिक्षा संख्या कमी असल्याने तासन्तास ई रिक्षाची वाट पर्यटकांना पहावी लागली असल्याने ई-रिक्षाकडे पर्यटक आकर्षित झाल्याचे चित्र समोर आले आहे.
नेरळ-माथेरान मिनिट्रेन बंद असल्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अमनलॉज ते माथेरान रेल्वे स्थानक अशी शटल सेवा सुरू ठेवली असल्यामुळे पर्यटकांनी मिनिट्रेन मधुन आनंद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. सकाळ पासून दुपारी ३ वाजे पर्यंत सर्व बोगी पर्यटकांनी फुल्ल भरल्या होत्या. अमन लॉज व माथेरान येथे दोन्हीकडे पर्यटकांच्या रांगा दिसत असल्याने मात्र शटल सेवा हाऊस फुल्ल झाली होती.
उन्हाळी पर्यटन हंगामापेक्षा पावसाळी पर्यटन हंगाम मागील पाच वर्षांपासून बहरत आहे हे आजच्या पर्यटक संख्येवरून दिसत आहे. १९९५ पर्यंत माथेरान हे पावसाळी बंद असतं. पण त्यांनतर पावसाळी पर्यटन सुरू झाले. आणि आज हे पर्यटन बहरत आहे ही माथेरानकरांच्या दृष्टीने चांगली बाब आहे. येथील पर्यटन हे पूर्ण सुरक्षित आहे त्यामुळे पर्यटक पावसाळी पर्यटनाला पसंती देतात.दीपक जाधव, माजी नगरसेवक