नेरळ : माथेरानमधील वनट्रील पॉईंट येथील दुकानदार वयस्कर दाम्पत्याला बांधून ठेवून चाकू सुऱ्यांचा धाक दाखवत त्यांच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखाची रोकडही अज्ञात चार इसमानी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेचा तपास हा माथेरान पोलीस करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे परिसरात असलेल्या वनट्रील पॉईंट येथे नारायण मारुती कदम व त्यांच्या पत्नी चंदा नारायण कदम हे वयस्कर दाम्पत्य हे अनेक वर्षापासून कदम टी स्टॉल या नावाने दुकान चालवित आहे. शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास सिगारेट पाहिजे या बहाण्याने चार अज्ञात इसमांनी त्यांच्या दुकानात प्रवेश करत दुकानमालक नारायण मारुती कदम व त्यांच्या पत्नी चंदा नारायण कदम यांना चाकू व सुऱ्याचा धाक दाखविवा. तसेच दोघांना घरातील टॉवेलसह अन्य कपडयांच्या सहाय्याने बांधून त्यांच्या जवळील सुमारे एक लाख रुपयांची रोकड तसेच सात ते आठ तोळे सोन्याचे दागिने हे लंपास करत हे चोरटे फरार झाल्याची घटना घडली आहे.
चोरीची माहिती ही माथेरानमध्ये पसरताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांच्यासह पोलीस टीम ही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी व पंचनामा करण्यात आला. अज्ञात चार चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळ परिसरातील व येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे तसेच श्वानपथकाच्या माध्यमातून वनट्रील पॉईंट येथील चोरी झालेले ठिकाणासह आजुबाजूच्या जंगल परिसातील तपास केला.