माथेरान न.प.ची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी ? pudhari photo
रायगड

Matheran Municipal Council : माथेरान न.प.ची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी ?

ई-टॉयलेटच्या प्रश्नावरून नगरसेवक प्रशासनाला धरणार धारेवर; सभेच्या अजेंड्यावर 38 विषय

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : माथेरान नगरपालिकेची तब्बल तीन महिन्यांनी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 15 मे रोजी सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेच्या पत्रिकेवर तब्बल 38 विषय असून विविध सुशोभीकरण कामांसह अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी येणार आहेत. तसेच आयत्या वेळचे विषय देखील मांडले जाण्याची शक्यता असल्याने ही सभा पुन्हा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

मागील 16 फेब्रुवारी रोजी झालेली सर्वसाधारण सभा विविध मुद्द्यांमुळे चांगलीच गाजली होती. विशेषतः ई-टॉयलेटच्या प्रश्नावरून नगरसेवक मनोज खेडकर आणि नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. ही सभा रात्री दहा वाजेपर्यंत चालली होती.

सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांकडून मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना धारेवर धरण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभारावरून अनेक नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत. पालिकेत वेळेवर उपस्थित न राहणे, प्रशासकीय काळात मनमानी निविदा प्रक्रिया राबविणे, तसेच बैठकींच्या नावाखाली खोटी बिले काढल्याचा आरोप केला जात आहे.

याशिवाय ई-टॉयलेट बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोपही होत असून, या प्रकरणाची पोलखोल सभेत होण्याची शक्यता आहे. लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या ई-टॉयलेटच्या वापराबाबत कोणतेही सूचना फलक नसल्याने ती वापराविना पडून असल्याची टीका केली जात आहे.

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 58 लाख रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली मशीन गेल्या काही महिन्यांपासून धूळ खात पडून असल्याचा मुद्दाही सभेत गाजण्याची शक्यता आहे. तसेच जीईएम पोर्टलवरून खरेदी करण्यात आलेल्या अनेक वस्तूंवर अनावश्यक खर्च झाल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन दाभेकर हे येत्या सभेत विशेष लेखापरीक्षण करून मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

तत्कालीन नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांची केलेली तक्रार

मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप होत असून, ‌‘कधीही कार्यालयात येणे आणि कधीही निघून जाणे‌’ या कार्यपद्धतीमुळे माथेरानकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी ते माणगाव नगरपालिकेत कार्यरत असताना तत्कालीन नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनीही त्यांच्या कारभाराविरोधात तक्रार दाखल केली होती, अशी चर्चा रंगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT