Matheran Horse Protest Pudhari
रायगड

Matheran Horse Protest: माथेरानमध्ये प्रशासनाविरोधात अश्वपालकांचे आंदोलन

पेव्हर ब्लॉकमुळे घोड्यांचे अपघात वाढले; १५ दिवसांत उपाय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन ही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने नाराज झालेल्या अश्वपालकांकडून घोडे बंद करून आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या सिमेंट प्लेव्हर ब्लॉक वरून पाय घसरून अपघात झालेले आहेत आता हे पेव्हर ब्लॉक हटवून घोडे आणि नागरिक चालतील असे सुसज्ज रस्ते करावे अशी मागणी असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सिमेंट पेव्हर ब्लॉक काढून रस्ते सुसज्ज करावे असे आदेश दिले असताना प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे यापुढे घोड्याचे अपघात झाल्यास यास सनियंत्रण समिती आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल असा पवित्रा घेतला असून नगराध्यक्षांच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्थानिक अश्वपाल संघटना आणि मुळवासीय अश्वपाल संघटना यांनी एकत्र येत श्रीराम मंदिर चौक येथे घोडेबंद आंदोलन सुरू केले होते. संघटनेच्या अध्यक्ष आशाताई कदम, माजी अध्यक्ष शैलेश शिंदे, सचिव विकास रांजाणे तसेच सर्व सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते. शंभर टक्के अश्वपालकानी या आंदोलनात सहभाग घेतला.

माथेरान मध्ये जे रस्ते बनवले त्यात कुठेही सिमेंट,रेती किव्हा सिरॅमिक मिश्रित ब्लॉक असतील तर ते काढून टाकावे असा स्पष्ट आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिला असून आजतागायत यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यावर सनियंत्रण समितीने काहीही कारवाई केली नाही. या ब्लॉकवरून घोडे चालतात. मात्र यावरून घसरण्याचे प्रमाण वाढले होते. अश्वपालकांवर ताशेरे ओढले जात होते. काही अश्वपालकांवर गुन्हे दाखल झाले होते. आदेश देऊन आठ महिने उलटले तरीही कोणतीच कारवाई झाली नसल्याने अश्वपालकांवर नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले असे अश्वपालकांनी सांगितले.

नगराध्यक्षांसमवेत बैठक

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या प्रयत्नाने मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी एक पत्र तयार करून अश्वपालकांना देण्याआधी अश्वपालकांनी आपली व्यथा मुख्याधिकारी यांकडे मांडली. यावर सनियंत्रण समितीसमोर हा विषय ठेऊ व त्यांचा जो आदेश येईल त्यानुसार पुढील कारवाई करू असे सांगितले. यावर अश्वपालकांनी पंधरा दिवसांचा वेळ दिला असून जर आमच्या मागणीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर पुढील दिशा ठरवून आंदोलन केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT