Matheran Charlotte Lake Pudhari
रायगड

Matheran Charlotte Lake: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माथेरानची जीवनवाहिनी शार्लोट लेक तुडुंब; महिनाभरानंतर तलाव ओसंडून वाहू लागला

‘रिव्हर्स वॉटरफॉल’ पुन्हा सक्रिय होणार; माथेरानकरांसह पर्यटकांमध्ये उत्साह

पुढारी वृत्तसेवा

आनंद सकपाळ

नेरळ: माथेरानकरांची मुख्य जीवनवाहिनी आणि शहराच्या जलसाठ्याचा आधार असलेला ऐतिहासिक शार्लोट लेक अखेर पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर तलाव तुडुंब भरल्याने माथेरानकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी काळात पर्यटकांना येथील नयनरम्य धबधबा आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या ‘रिव्हर्स वॉटरफॉल’चा आनंद पुन्हा घेता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी तलावातील गाळ काढण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नागरिकांच्या आग्रहाखातर तलावातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे तलाव काही प्रमाणात स्वच्छ करण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी तलावाचे पाणी रोखण्यात आले.

मात्र, त्याच काळात पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तलाव पुन्हा भरेल का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.मात्र, तलावाच्या तिन्ही बाजूंनी असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांमधून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे अखेर शार्लोट लेकने महिनाभरात पुन्हा आपली पूर्ण जलसाठा क्षमता गाठली.

तलाव ओसंडून वाहू लागल्याने त्याचे पाणी बाहेर पडत असून, परिसरातील निसर्गसौंदर्याला पुन्हा बहर आला आहे. शार्लोट लेक पूर्ण भरल्याने तलावाच्या ओव्हरफ्लोमधून वाहणारा मनमोहक धबधबा पुन्हा सुरू झाला आहे. काही दिवस तलावातील पाण्याची पातळी कमी असल्याने माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत होता. आता मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माथेरानच्या पावसाळी पर्यटनाला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला ‘रिव्हर्स वॉटरफॉल’ही पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फायदा होणार असून, स्थानिक हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, घोडेवाले आणि इतर व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निसर्गाने दिले उत्तर...

तलाव स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडण्याच्या निर्णयावर काही राजकीय मतभेद आणि अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा त्या काळात होती. मात्र, माथेरानमधील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी

आज तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, जलसाठा, आरोग्य आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीने हा निर्णय सकारात्मक ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शार्लोट लेकचे तुडुंब भरलेले रूप पाहायला मिळाल्याने हा माथेरानकरांसाठी ‘दुग्धशर्करा योग’ असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

तलावाच्या पुनर्भरणामुळे माथेरानच्या पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल माथेरानकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT