उरण (रायगड) : मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनमुुळे पनवेल,उरणमधील वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. ज्या मार्गाने आंदोलनकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत. त्या जेएनपीएम महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागररिकांनाही बसत आहे.दरम्यान,आंदोलनकर्त्यांचा मुक्काम कळंबोली,कामोठे येथे करण्यात आल्याने तेथील वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा उडाला आहे.
जेएनपीए बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर, धुतुम, चिर्ले ते गव्हाण फाटा अशा जवळपास 12 ते 15 किलोमीटरच्या रस्त्यावर कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीत उरण शहराच्या पूर्व भागातून ये-जा करणारे अनेक प्रवासी आणि नोकरदार वर्ग तब्बल चार ते पाच तास अडकून राहिले, ज्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका वाहतूकदार आणि व्यावसायिकांना बसला. कंटेनर वेळेवर बंदरात पोहोचू न शकल्यामुळे जहाजावरील माल भरण्याची अंतिम मुदत चुकली. परिणामी, कंटेनरची निर्यात थांबली. यामुळे होणारे अतिरिक्त शुल्क आणि विलंब शुल्क वाहतूकदारांना सोसावे लागत आहेत. रॉयल ट्रान्सपोर्टचे प्रमुख पंढरीनाथ गांजवे यांनी सांगितले की, कंटेनर वेळेवर न पोहोचल्यामुळे लागणारे चार्जेस आम्हाला भरावे लागतात. कोणत्याही कारणास्तव बंदराची वाहतूक बंद न ठेवता ती सुरळीत ठेवावी.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी उरण, न्हावा शेवा आणि गव्हाण फाटा वाहतूक विभागाचे पोलीस सतत प्रयत्न करत होते. पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याकडे जाणार्या कंटेनर वाहनांच्या तीन-तीन रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी प्रयत्नांनी यातील एक रांग सुरू करण्यास यश मिळवले. न्हावा शेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी सांगितले की, आंदोलनामुळे वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नवी मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक सध्या बंद असून ती रात्री उघडली जाईल. या आंदोलनामुळे केवळ वाहतूकदारच नव्हे, तर जेएनपीए बंदराच्या एकूण व्यवसायावरही नकारात्मक परिणाम झाला आहे.