Chandrakant Patil | ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही : मंत्री चंद्रकांत पाटील
पंढरपूर : मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी आरक्षणातून सर्व मिळाले होते. मात्र, राजकीय आरक्षण मिळाले नव्हते म्हणून आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असे ठणकावून सांगत मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन हे राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा, म्हणून करण्यात येत आहे. असा गंभीर आरोप उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मंत्री पाटील हे रविवारी पंढरपूर येथे आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरत आहेत. ओबीसीतून आरक्षण मिळणारच नाही. त्यामुळे जरांगे हे मराठा सामाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, असे म्हणत आहेत. ते अनाठायी आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे जरांगे यांना इतक्यात भेटणार नाहीत. मात्र, शिष्टमंडळ चर्चा करणार आहेे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व समाजाचा विचार केला आहे. मराठा समाजाचा कधीच तिरस्कार केला नाही. उलट जे काही करता येईल, ते ते त्यांनी आतापर्यंत केले. जरांगे यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे. चर्चा करून मार्ग निघत असेल तर योग्य होईल, असेही ते म्हणाले.
आरक्षण कोर्टात अडकवायचे आहे का?
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) चे आरक्षण मिळाले आहे. कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ईडब्ल्यूएस हेच मराठ्यांचे खरे आरक्षण आहे. एकही मराठा नोंदीशिवाय, पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार. आरक्षण कोर्टात जाऊन अडकवायचे आहे का? तुम्हाला असे समाधान हवे आहे का? की आंदोलनातून एकदाचे आम्हाला मोकळे करा. द्या की काहीतरी, आपण कोर्टात बघू, असे काही आहे का? ते आपण ठरवा, असा सवालच चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांना केला.

