

बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावातही मराठा समाज एकवटला. सीमाभागातील मराठा समाज मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी असून पावसाची तमा न करता छत्रपती शिवाजी महाराज ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांपर्यंत मोर्चा काढून पाठिंबा देण्यात आला.
सकल मराठा समाजातर्फे रविवारी (दि. 31) सकाळी मोर्चाला सुरवात करण्यापूर्वी शहापूर शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषासह ’एक मराठा, लाख मराठा’ असा गजर करण्यात आला. मराठा बांधव भगवी टोपी, भगव्या शाली घालून भगव्या झेंड्यासह मोर्चात सहभागी झाले. मोर्चाच्या अग्रभगी ट्रॅक्टरमध्ये शिवपुतळा ठेऊन मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.
मोर्चा एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, पाटील गल्ली, हेमू कलानी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, सम्राट अशोक चौक, किर्लोस्कर रोडमार्गे धर्मवीर संभाजी महाराज चौकात पोचला. प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, सिद्दाप्पा कांबळे, नेताजी जाधव, बसवराज कांबळे आदींच्या उपस्थितीत संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला.
मोर्चादरम्यान एसपीएम रोड ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतची वाहतूक वळवण्यात आली होती. मराठा समाजाबरोबर इतर समाजातील लोकांनीही मोर्चात सहभाग घेतला होता. मालोजी अष्टेकर, नगरसेवक रवी साळुंखे, गुणवंत पाटील, मदन बामणे, अॅड. अमर यळ्ळूरकर, माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, गणेश दड्डीकर, अंकुश केसरकर, आर. के. पाटील, जोतिबा आंबोळकर, विनोद आंबेवाडीकर, चंद्रकांत कोंडुसकर, दत्ता जाधव, प्रकाश अष्टेकर, महेश जुवेकर, अनिल हेगडे, महादेव गुरव, कृष्णा पन्हाळकर, आनंद आपटेकर, सागर पाटील, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, संजय शिंदे, राजू बिरजे, राजू पावले, विकास कलघटगी, विश्वास घोरपडे, बळवंत शिंदोळकर, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सुनील मुरकुटे, अनिल पाटील, अप्पासाहेब किर्तने, रमेश पावले, मुरलीधर पाटील, अॅड. एम. जी. पाटील, श्रीधर खन्नूकर, बंडू केरवाडकर, गोपाळ पाटील, मारुती रेमाण्णाचे, दुदाप्पा बागेवाडी आदी उपस्थित होते.
आरक्षणाच्या लढ्याला पाठींबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला दलित संघर्ष समितीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी हेमू कलानी चौक येथे मोर्चात सहभाग घेतला. सिद्धाप्पा कांबळे, बसवराज कांबळे, मोहन कांबळे यांच्यासह नेते मोर्चात सहभागी झाले. जय भीम, जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.