Rain Delay Pudhari
रायगड

Rain Delay: खेळ मांडला देवा...! पावसासाठी शेतकऱ्यांचा टाहो!

शिवारात पेरणी, डोळ्यात चिंता "करपलं रान देवा, जळलं शिवार..

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई... हरवली वाट दिशा अंधारल्या दाही..." या गीतातील वेदना आज कोकणातील शेतकऱ्यांच्या काळजाचा हुंदका बनून आकाशाकडे झेपावत आहेत. निसर्गाच्या लहरीपणा समोर हतबल झालेला शेतकरी आज अक्षरशः देवाच्या दारी उभा राहून पावसासाठी आर्त हाक देत आहे.

माणगाव तालुक्यातील कांही शेतकऱ्यांनी शिवारात पेरणी केली आहे. आकाशात मात्र कळ्या कुट्ट ढगांनी काहूर माजले आहेत. मात्र कांही केल्या पाऊस पडत नाही. हळूहळू मृग नक्षत्र सरत आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत असून त्यांची चिंता वाढली आहे....! मृग नक्षत्र सरत आले "तरी नाही धीर सांडला... देवा खेळ मांडला" अशा विवंचनेत शेतकरी आहे.

गेल्या वर्षी अवकाळी पावसाने २० मे पासूनच हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रातील जोरदार पावसाने ३१ मे नंतर संपूर्ण कोकणाला चिंब भिजवले होते. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. कोकणात पावसाच्या आगमनाची पारंपरिक तारीख मानला जाणारा ७ जूनचा दिवसही उलटून गेला, तरी अद्याप पावसाचा ठोस मागमूस नाही.

दररोज आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात, वाऱ्याची झुळूक आशेचा संदेश देऊन जाते, पण क्षणात सर्व काही विरून जाते. आभाळ येते, मात्र बरसत नाही. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आपल्या शेतात राब भाजून काही ठिकाणी धूळ वाफ्यावर भाताची पेरणीही करण्यात आली आहे.

कोकणातील शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आणि निसर्गा वरील विश्वास लक्षात घेता अनेकांनी वेळ न दवडता बियाणे जमिनीत सोपवले. परंतु अपेक्षित पाऊस न पडल्याने आता हे बियाणे उगवेल की नाही, याची चिंता त्यांच्या मनात घर करून बसली आहे. भेगाळलेल्या मातीत विसावलेले बियाणे पावसाच्या एका थेंबासाठी आसुसले आहे.

शेतातील प्रत्येक बांध, प्रत्येक वाफा आणि प्रत्येक रोप जणू आकाशाकडे टक लावून पाहत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशेचे पाणी आता चिंतेच्या अश्रूंमध्ये रूपांतरित होऊ लागले आहे. आज कोकणातील बळीराजाचा टाहो एकच आहे. "बळ दे झुंजायाला, किरपेची ढाल दे."

करपलेल्या रानावर, जळलेल्या शिवारावर एक पावसाची सर यावी, एक थेंब मातीत मुरावा आणि बियाण्याला जीव यावा, एवढीच साधी, हृदयस्पर्शी विनवणी घेऊन माणगावचा शेतकरी आज देवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. "उसवलं गनगोत सारं, आधार कुनाचा न्हाई" या ओळीं प्रमाणेच कोकणातील शेतकऱ्यांची अवस्था आज आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतावर अवलंबून असतो. खरीप हंगाम म्हणजे वर्ष भराचं धान्य, वर्षभराचा आधार. तो हंगामच धोक्यात आला तर उरतं काय ? भेगाळलेल्या भुईसारखंच जिणं जाळत राहतं. घरातली म्हातारी माय देव्हाऱ्यासमोर हात जोडून बसलीय. शेतकरी दरवाजात उभा राहून आभाळाकडे पाहतोय. मुलंबाळं चिंतेने गप्प बसली आहेत.

तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला...

कोकणातील शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून येथील संस्कृती, परंपरा आणि कुटुंब व्यवस्थेचा आत्मा आहे. भात शेतीवर हजारो कुटुंबांचे आर्थिक चक्र अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या प्रत्येक विलंबित दिवसा सोबत शेतकऱ्यांची धाकधूक वाढत आहे. कर्ज, मशागतीचा खर्च, बियाण्यां वरील गुंतवणूक आणि पुढील हंगामाचे गणित यामुळे त्यांच्या मनावरील ताण अधिकच गडद होत चालला आहे.

आज कोकणातील शेतकरी, त्याची पत्नी, कुटुंब आणि मातीत राबणारा प्रत्येक हात एकच प्रार्थना करत आहे. त्यांच्या आर्त हंबरड्याला आभाळाची साथ लाभावी, काळ्या ढगांनी अखेर दयाघन व्हावे आणि जीवनदायी पाऊस बरसावा, हीच माफक अपेक्षा शेतकरी करत असून आकाशाकडे लागलेल्या हजारो डोळ्यांतून एकच हाक उमटत आहे.

"सांडली गा रीत भात, घेतला वसा तुझा... दावी देवा पैलपार, पाठीशी तू ऱ्हा हुबा..." कारण आता हा केवळ पावसाचा प्रश्न राहिलेला नाही, हा कोकणच्या मातीतल्या जीवनाचा, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या जगण्याच्या आशेचा प्रश्न बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT