

सुवर्णा दिवेकर
अलिबाग: शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा संपली मात्र बळीराजा आभाळाकडे आजही डोळे लावून बसलाय. धरणावर अवलंबून असलेल्या गावे आणि वाड्यांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
पाणी पिण्यासाठी पायपिट करावी लगत आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, अनेक धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या भीषण होऊ लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९२ गावे व ३०३ वाड्यांवरील १ लाख ५३ हजार १५७ नागरिकांना पाणीटंचाईने ग्रासले असून, त्यांना ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान जिल्ह्यात मान्सूनचे आगमन लांबल्याने पाणी टंचाईग्रस्त भागातील नागरिक चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणार्या प्रकल्पात पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध नाही. दिवसागणिक धरणांतील जलसाठा कमी होत असल्यामुळे पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.
अनेक गावांतील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसोदूर पायपीट करावी लागत आहे. अनेक गावांत तर पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथे पाणी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आहेत. जेथे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तेथे जनावरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील ९२ गावे, ३०३ वाड्या अशा एकूण ३९५ ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवते आहे. नागरिकांची पाण्यासाठी हेळसांड होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. या टँकरवरच टंचाईग्रस्त गावांची मदार अवलंबून आहे. अजून पावसाला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे टँकरग्रस्त गावांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये मार्चपासूनच पाण्याची समस्या सुरू झाली आहे. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वीस लीटर पाणी ५० ते ६० रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गावात पाण्याचे टँकर येताच पाणी भरण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. कधी कधी पाणी भरण्यावरुन वादही होत आहेत. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्यांना दिलासा मिळत असला तरी पाऊस वेळेवर पडला नाही तर आगामी काळात जिल्ह्यातील आणखी बर्याच गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावी लागत आहे.