कोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील शेतकऱ्यांना महिसदरा कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात येणारे पाणी अद्याप न सोडल्याने गोवे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्ग 66 वरुन कुंडलिका नदीच्या उजवा तीर काळव्यामधून महिसदरा कालव्याला पुई तसेच गोवे गावातील शेतकऱ्यांच्या भातशेतीला अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात आहेत. या पाण्यामुळे उन्हाळी भातशेतीमध्ये उत्तम प्रकारे भात पिक घेतले जाते. गेल्या वर्षी मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे पुई तसेच गोवे गावाला पाणी पुरवठा करणारा चेंबर तसेच त्याच्या पुढे असणारी मोरी तोडण्यात आली. याविषयी या मोरीचे बांधकाम करण्यासाठी गोवे गावातील ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरले होते.त्यावेळी मुंबई गोवा हायवेचे ठेकेदार व पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता यांनी त्या ठिकाणी येऊन ती मोरी बांधण्याचे आश्वासन दिले.
याबरोबर पुढील कालवा दुरुस्तीचे काम करण्यात येईल यासाठी आम्हांला एक वर्षे द्या.सर्व कामे मार्गी लावून पुढील वर्षी पाणीपुरवठा पुर्ववत सुरु करू असे आश्वासन देण्यात आले.यानंतर मोरीचे काम करण्यात आले.परंतु काही ठिकाणचे पाईप लाईनचे काम व इतर काम अद्याप ही बाकी आहे. या वर्षी महिसदरा कालव्याला पाणी सुटणार म्हणून शेतकऱ्यांनी गवत काढले तसेच इतर पुर्व मशागतीची कामे केली.
परंतु पाटबंधारे खात्याकडून महिसदरा कालव्याला पाणी सोडण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे पाणी सोडण्यासाठी गोवे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामपंचायती तर्फे कोलाड पाटबंधारे खात्याला 26 डिसेंबर 2025 रोजी अर्ज देण्यात आला.या नंतर कालव्याच्या दुरुस्तीचे काम करून 10 ते 15 जानेवारीच्या आता पाणी सोडण्यात येईल असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले. याला 20 दिवस उलटून गेले तरी महिसदरा कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही यामुळे नुकसान होणार आहे.
पाटबंधारे खात्याकडून गेल्या वर्षांपासून उन्हाळी भातशेतीला पाणी न सोडल्यामुळे भातशेती नुकसान होत आहे.गोवे येथील भातशेतीला कालव्याला पाणी सोडण्यात यावे असा अर्ज गोवे ग्रामपंचायती मार्फत केला आहे. परंतु जानेवारीचे 15 दिवस संपले तरी शेतकऱ्यांच्या भातशेतीला पाणी सोडण्यात आले नाही.जर भातशेतीला पाणी मिळाले नाही तर पाटबंधारे खात्याकडून नुकसान भरपाई देण्यात यावी.महेंद्रशेठ पोटफोडे, गोवे