अलिबाग : सुवर्णा दिवेकर
दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानापासून मतमोजणीपर्यंत लागणाऱ्या सर्व कामकाजाचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्ह्य प्रशासनाकडून देण्यात आली. सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी या निवडणुकीच्या कामासाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी 34 आणि नगरसेवकपदासाठी 595 असे एकूण 629 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या नगरपरिषदांच्या हद्दीत 107 प्रभाग आहेत. नगराध्यक्षपदाच्या दहा आणि नगरसेवकपदाच्या 209 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
खोपोलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी सात व नगरसेवकपदासाठी 118, अलिबागमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 42, श्रीवर्धनमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी 60, मुरूडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी 58, रोहामध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवकपदासाठी 51, महाडमध्ये नगराध्यक्षपदासाठी पाच व नगरसेवक पदासाठी 53, पेणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन व नगरसेवक पदासाठी 72, उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी 49, कर्जतमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन आणि नगरसेवक पदासाठी 46, माथेरानमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी 46 उमेदवार आहेत.
निवडणूक प्रचाराला आता अवघे तीन दिवस बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार आपापल्या प्रभागात प्रचार करण्यात मग्न आहेत. मतदारांच्या भेटी कडे सर्वांचा कल जास्त आहे. मतदानासाठी त्यांना आवाहन करणे. काही कारणानिमित्त बाहेर असणाऱ्या मतदारांशी बोलून त्यांना मतदानाला येण्यासाठी पाठपुरावा करणे. अशा गोष्टीं उमेदवार करीत आहेत. 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे. आरोप-प्रत्यारोपांसह वेगवेगळे व्हिजन घेऊन ही निवडणूक लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मतदान दोन डिसेंबरला होणार असून, 308 केंद्रांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. दोन लाख 37 हजार 503 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासाकडून तयारी जोरात सुरु केली आहे. मतदान केंद्रांची पाहणी करण्यापासून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातून सुमारे दोन हजार कर्मचारी मतदान व मतमोजणीच्या कामासाठी लागण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणेकडून देखील दक्षता घेण्यात आली आहे.
अलिबागमध्ये 19 केंद्रांमध्ये होणार मतदान
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक आणि महायुतीमधील एक असे दोघेजण रिंगणात आहेत. नगरसेवकपदाच्या 20 जागांमध्ये एक जागा बिनविरोध जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसचे उमेदवार प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले. त्यामुळे आता नगरसेवक पदाच्या 19 जागांसाठी 42 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीचे मतदान 19 केंद्रांमध्ये होणार आहे. 16 हजार 354 मतदार मतदानाचा हक्क बजाणार आहेत. 28 नोव्हेंबरला पेट्या सिलींग केल्या जाणार आहेत. मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम तयार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.