Maharashtra monsoon update pudhari photo
रायगड

Maharashtra monsoon update : आर्द्राचा जोर ओसरला, आता येतोय तरणा पाऊस

पुनर्वसू नक्षत्रात वरुणराजा अश्वावर स्वार

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अतुल गुळवणी

आर्द्रा नक्षत्राचा कार्यकाल संपला असून, आता वरुणराजा पुनर्वसू नक्षत्रात अश्वारुढ होऊन सोमवारी दुपारी दाखल झालाय. आर्द्रा नक्षत्राच्या अखेरच्या टप्प्यात राज्यभरात कोसळणारा वरुणराजा आता काहीसा वेग कमी करणार आहे. त्याची प्रचिती सोमवारी दुपारपासूनच दिसून आली असून, आठ दिवस मुसळधारपणे कोसळणारा पाऊस काहीसा ओसरला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागांना दिलासा मिळणार आहे. ६ ते २० जुलै असा या नक्षत्राचा कालावधी आहे.

जूनमध्ये मृग नक्षत्र तसे कोरडेच गेले. सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली.पण आर्द्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावत अवघा महाराष्ट्र व्यापला.सरासरीपेक्षा जास्त पाऊस आठवडाभरात पडल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला.

विशेष करुन शेतकरी वर्गाला पावसाने मोठा आधार मिळाला. अनेक धरण क्षेत्रात पाण्याची पातळीही समाधानकारक झाली. कोरडे पडलेले तलाव तुडूंब भरुन गेले.तर नद्याही प्रवाहित झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला. अखेरच्या आठवडाभरात पडलेल्या पावसाचा मोठा फटका सार्वजनिक व्यवस्थेलाही बसलाय.

अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली.अनेक ठिकाणी पूल,घरे कोसळण्याच्या घटनाही घडल्या.काहीजणांना जीवही गमवावे लागलेत.

मध्यमस्वरुपाचा पाऊस कोसळणार

सोमवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी सूर्याने पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आहे.पंचांगशास्त्रात पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस असेही संबोधले जाते.पुनर्वसू नक्षत्राचे वाहन अश्व हे आहे.त्यामुळे या नक्षत्रकाळात पावसाचा जोर काहीसा मंदावेल असा तर्क पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या नक्षत्रकाळात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल,असा अंदाजही व्यक्त केला आहे.विशेष करुन ८, १०, १३ ते १५ आणि १७ जुलै या दिवशी पावसाचा जोर असेल असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे.

म्हातारा मात्र दमवणार

२० जुलैला ११ वाजून २७ मिनिटांनी मघा नक्षत्राचा प्रारंभ होत आहे.पंचांगशास्त्रात या कार्यकाळात पडणाऱ्या पावसाला म्हातारा पाऊस असे संबोधतात. या नक्षत्राचे वाहन मुषक आहे.या काळात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल, काही ठिकाणी पूरजन्य स्थितीही निर्माण होईल,असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे.या नक्षत्रकाळात २० ते २४ आणि २८,२९ जुलैला पावसाची शक्यता वर्तविली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT