रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांचा उच्छाद
नुकसान भरपाईत सुसूत्रता येणार
माकडांना मानवी वस्तीपासून किमान १० किलोमीटर दूर नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार
Monkey Catching Reward Doubled
रायगड : जयंत धुळप
कोकणासह राज्यातील फळबागा आणि शेतीचे माकडांच्या उपद्रवामुळे होणारे नुकसान ही एक मोठी समस्या आहे. माकडांकडून होणारा हा उपद्रव रोखण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना पकडणाऱ्या व्यक्तींना किंवा संस्थांना देण्यात येणाऱ्या मानधनात सरकारने आता दुप्पट वाढ केली आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बागायदार संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून माकडांच्या बंदोबस्तासाठी मागणी केली जात होती. याची दखल घेत सरकारने २२ एप्रिल २०२६ रोजी विशेष शासन निर्णय निर्गमित केला आहे. यानुसार, पूर्वी एका माकडाला पकडण्यासाठी दिले जाणारे ३०० रुपयांचे मानधन आता ६०० रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे माकड पकडणाऱ्या पथकांना प्रोत्साहन मिळणार असून मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
माकडांचा सर्वाधिक उच्छाद आणि उपद्रव कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो. रायगड जिल्ह्यात माथेरान या पर्यटनस्थळी माकडांचा मोठा उपद्रव पर्यटकांना होतो. पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ ही माकडे हातोहात लंपास करतात. माथेरानमध्ये आंबे आणि जांभळाच्या झाडांवर या माकडांचा मुक्कामच असतो आणि या झाडांवरील एकही आंबा आणि जांभळे मालकांना मिळत नाहीत. या उपद्रवामुळे माथेरानमध्ये फळझाडे लावण्याच्याच फंदात कुणी पडत नाही. कर्नाळा अभयारण्यातील माकडांना गोवा महामार्गावर येण्याची सवय हौशी पर्यटक आणि वाहनचालकांनीच लावली आहे. कर्नाळा टप्प्यात गाड्या थांबवून या माकडांना केळी, बिस्किटे असे खाऊ घातले जाते. त्याची सवयच आता या माकडांना लागली आहे. मग ज्यावेळी खाद्य मिळत नाही त्यावेळी ते येथे येणाऱ्या पर्यटकांकडील खाद्य हिसकावून घेतात. प्रसंगी वाहन अपघातात सापडून माकडांचे मृत्यूदेखील येथे झाले आहेत.
अलिबाग तालुक्यात चौल रेवदंडा या परिसरात नारळी-फोफळीच्या बागा आहेत. त्यात आंबा, फणस, कोकम या फळझाडांवरील फळे ही माकडे फस्त करून मोठे नुकसान करीत असतात. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा मोठा त्रास आहे. पूर्वी येथे कौलेदार घरे होती, त्यावर माकडे उड्या मारून कौले फोडून नुकसान करीत असत. या उपद्रवास कंटाळून अखेर लोकांनी घरांवर पत्रे घातली तर काहींनी घरांवर सिमेंटचे स्लॅब घालून घरे बांधली आहेत, अशी माहिती चौलमधील प्रयोगशील शेतकरी शैलेश राईलकर यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि राजापूर या दोन तालुक्यांत माकडांचा सर्वाधिक उपद्रव असून तालुक्यात आंबा-काजू बागांचे अतोनात नुकसान होत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा परिसरात हा उपद्रव अधिक आहे. तर उर्वरित जिल्ह्यात आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान माकडांच्या उपद्रवामुळे होत असते. पश्चिम महाराष्ट्रातील आजरा परिसर आणि उत्तर महाराष्ट्रातील नवापूर भागातही माकडांचा धुमाकूळ असतो.
केवळ मानधनात वाढ करून न थांबता, वनविभागामार्फत मिळणाऱ्या पीक नुकसानीच्या भरपाई प्रक्रियेतही सुसूत्रता आणण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. पकडलेल्या माकडांना मानवी वस्तीपासून किमान १० किलोमीटर दूर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, जेणेकरून ते पुन्हा बागांकडे वळणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे. परंतु वास्तवात असे घडेल का असा प्रश्न आहे. कारण माकडे भुकेपोटी गावांत आणि शहरात येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगल भागात खाद्य कमी झाल्यावर त्यांचा मोर्चा बागायती क्षेत्रात वळत असतो.
माकडांमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात होता. आता मानधनात वाढ झाल्यामुळे स्थानिक पातळीवर माकड पकडण्याच्या मोहिमांना वेग येईल, अशी भावना बागायतदारांनी व्यक्त केली आहे. आंबा आणि काजूच्या हंगामात या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.