

देवगड : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देवून आपण शरद पवार यांच्यापासुन सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर टक्कर दिली. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे बिलंदर मुख्यमंत्री पाहिले नाहीत. कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना ५० कोटीची मदत देण्यासाठी त्यांच्या सरकारकडे पैसा नाही. आंब्याचा नुकसानीपोटी या सरकारने प्रती झाड २५० रूपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करून शेतकरी आंबा बागायतदारांची फसवणुक केली आहे.
या फसवणुकीविरोधात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी थेट मुंबई येथील वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा निर्धार स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी देवगड येथील आंबा काजू बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात व्यक्त केला. शनिवार रत्नागिरी येथे होणाऱ्या मेळाव्यात याबाबतची तारीख ठरविणार असल्याचे शेट्टी यांनी जाहीर केले.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधुदूर्ग यांच्या एल्गार मेळाव्यात राजू शेट्टी यांनी आंबा काजू बागायतदारांच्या प्रश्नाबाबत शासनाविरोधात करण्यात येणाऱ्या पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. यावेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, वेंगुर्ले येथील आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सुधीर जोशी, आप्पा अनभवणे, पं.स.सदस्य विष्णु घाडी, राजेंद्र गड्यानवार आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी यांनी आंबा व काजू बागायतदार यांना नुकसानभरपाई देताना शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंजी मदतीबाबत शासनावर सडकून टीका केली.राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग असो वा कुंभमेळा यासाठी हजारो कोटी रूपये खर्च करण्याचे जाहीर करते. नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यात यायला मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री यांना वेळ असतो मात्र कोकणातील संकटात सापडलेल्या बागायतदारांशी संवाद साधण्यास त्यांना वेळ नाही. बागायतदारांना प्रती झाड ५ हजार रूपये नुकसानभरपाई द्यावी अशी बागायतदारांची मागणी होती मात्र प्रती झाड २२० रूपये नुकसानभरपाई जाहीर करून शासनाने बागायतदारांची थट्टा केली आहे.याचा जाब मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी मुंबई येथे रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार व शेतकरी यांच्यासह वर्षा बंगल्यावर धडक देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कोकणातील रोजगार निर्माण करण्याची क्षमता आंब्यामध्ये आहे.रोजगारासाठी बाहेरून उद्योग आणल्यास कोकण भकास होईल. निसर्गसंपत्तीवर उद्योगधंद्याच्या माध्यमातून पाणी प्रदुषण व हवा प्रदुषण झाल्यामुळे आंबा पीकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आंबा काजू बागायतदारांनी सावध होणे गरजेचे आहे.
कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नासाठी मुंबई येथील व्यापारीवर्गाशी थेट बोलून समस्या मांडली आहे.आंबा बागायतदारांकडून यावेळी व्याजी रक्कम वसुल करण्यात येवून पये. व्याजी रक्कम देण्याचा परवाना आपल्याकडे नाही त्यामुळे वसुलीचा ससेमिरा लावल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू असे सुनावले आहे.तसेच इतर राज्यातील आंबा आणून देवगड व रत्नागिरी आंबा म्हणून विक्री करणाऱ्यांविरोधातही मोहिम उघडणार असून अशा विक्रेत्यांचे आंबे थेट रस्त्यावर फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असेही शेट्टी यावेळी म्हणाले. यावेळी मालवणमधील मच्छिमारांच्या आंदोलनालाही जाहीर पाठींबा देत असल्याचे शेट्टी यांनी सांगीतले. मर्यादित ताकद असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावे यशस्वी करून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांचा नीतीप्रमाणेच चळवळ पुढे नेण्यासाठी गर्दीची गरज नाही तर गर्दीपेक्षा दर्दी माणसांची गरज आहे असे ते म्हणाले,
माजी आमदार बाळ माने
आंबा व काजू बागायतदार यांनी देवगडमधून आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेले हे आंदोलन आता संपूर्ण कोकणात पसरले असून या आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्याचाही पुर्ण पाठींबा आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा या चळवळीला पाठींबा असून ही चळवळ तहयात सुरू ठेवूया. मुंबई येथील धडक मोर्चात सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
बागायतदार म्हणून आम्ही तुमच्या कायम पाठीशी; सुशांत नाईक
राज्यसरकारने आंबा बागायतदारांना तुटपुंजी मदत जाहीर केली, परंतु नुकसानीचे पंचनामे अद्याप केले नाहीत. पंचनामेच झाले नाही तर मदत कशी मिळणार असा सवाल सुशांत नााईक यांनी केला. मुख्यमंत्री नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी कणकवलीमध्ये आले मात्र शेतकऱ्यांचे अश्रू फुसण्यासाठी आले नाहीत. जि.प.व पं.स.निवडणुकांमध्ये निवडुन आलेले सत्ताधारी लोकप्रतिनिधी बागायतदारांच्या संकटावेळी झालेल्या आंदोलनात कुठेही दिसले नाहीत मात्र पराभूत उमेदवार तुमच्यासाठी हक्काने भांडत आहेत. बागायतदार म्हणून आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत असे नाईक म्हणाले.
शासनाचे डोके ठिकाणावर आहे का? ; सुधीर जोशी
प्रती झाड २२० रूपये नुकसानभरपाई जाहीर शासनाने जाहीर केली. या शासनाचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल सुधीर जोशी यांनी केला.आंबा बागायतदारांच्या प्रश्नासाठी कोकणातील आमदारांनी विधानसभेत आवाज उठविणे आवश्यक होते. परंतु हे चित्र दिसले नाही हे दुर्दैवी आहे. कोकणच्या नेत्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे होता. यावेळी गणेश गावकर, विष्णू घाडी,आप्पा अनभवणे, संजय गावडे, विजय कोंडकर, राजेंद्र गड्यनवार, विद्याधर जोशी यांनी विचार व्यक्त केले.प्रास्ताविक किरण टेंबुलकर तर सुत्रसंचालन व आभार सागर जोईल यांनी मांडले.यावेळी प्रशांत qशदे, तुषार पाळेकर, गणेश वाळके आदी बागायतदार उपस्थित होते.