रायगड : गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्ह्यांची माहिती देण्याचे काम करणारे पोलीस पाटील यांची एक हजार 91 पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर अनेक गावांचा भार पडला आहे. ही पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी पोलीस पाटील संघाकडून करण्यात आली आहे. मात्र त्याची कार्यवाही अद्याप करण्यात आली नाही. त्याचा परिणाम एक हजार 91 गावे पोलीस पाटील विना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस व महसूल प्रशासन थेट जनतेपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे शासनाने गृह विभागामार्फत पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या मदतीसाठी पोलीस पाटील यांची नियुक्ती केली. गावामध्ये शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखणे. गुन्ह्यांची माहिती देणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे, निवडणुकीत पोलिसांना मदत करणे. दरोडा, शांतता भंग किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांपासून गावाला सुरक्षित ठेवणे. गैरवर्तन किंवा दुर्लक्षाच्या घटनांची माहिती पोहोचवणे, अशा अनेक प्रकारची कामे पोलीस पाटील करतात. कोरोना काळात महसूल, आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून पोलीस पाटील काम करीत होते.
लॉकडाऊनच्या वेळी गावागावात जाऊन जनजागृती करण्याचे काम पोलीस पाटील यांनी केले. गावागावात दवंडीच्या माध्यमातून सतर्क राहण्याबरोबरच सुरक्षा राखण्याचे आवाहन पोलीस पाटील यांनी केले. त्यामुळे महसूल प्रशासन, पोलिस व नागरिक यांच्यामधील मधला दुवा म्हणून पोलीस पाटील यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामीण भागात शांतता राखण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. निवडणूकीच्या कालावधीत देखील पोलीस पाटील यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. मात्र रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून पोलीस पाटील यांची भरती केली नाही. त्यामुळे कार्यरत असलेल्या पोलीस पाटील यांच्यावर कामाचा ताण पडला आहे.
एका पोलीस पाटील यांच्याकडे दोन ते तीन गावांचा भार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे गावांतील गुन्हे व इतर माहिती पोलीस व प्रशासनाकडे पोहचविताना कार्यरत पोलीस पाटील यांना अडचण निर्माण होत आहे. काही पोलीस पाटील सेवानिवृत्त झाले. परंतु त्या जागी नवीन पोलीस पाटील यांची भरती केली नसल्याने ही पदे रिक्तच राहिली आहेत. त्यामुळे पोलीस पाटील विना गाव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील गावांची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे. ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. जिल्ह्यासाठी एक हजार 995 पोलीस पाटील यांची पदे मंजूर आहेत. यापैकी फक्त 904 पदे भरण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची माहिती देण्याचे तसेच महसूल प्रशासनाला मदत करण्याचे काम कार्यरत पोलीस पाटील यांच्या मार्फत केले जात आहे.
जिल्ह्यात एक हजार 91 पोलीस पाटील यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एक हजार 91 गावे पोलीस पाटील विना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांतील काही गुन्ह्यांची माहिती पोलीस पाटील यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी नागरिकांना दुसऱ्या गावातील पोलीस पाटील यांच्याकडे जावे लागत आहे. पोलीस पाटील यांची भरती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी मागील अनेक वर्षापासून पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात आली आहेत. मात्र त्याची कार्यवाही केली नसल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. पोलीस पाटील हा स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील पहिला महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची ठरते.
रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरण्यात यावी, यासाठी संघाच्या वतीने वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरून पोलीस पाटील यांची माहिती मागविण्याचे काम देखील करण्यात आले आहे. परंतु अद्यापर्यंत पोलीस पाटील यांची पदे भरली नसल्याने कार्यरत पोलीस पाटील यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच निवडणूक व इतर आपत्कालीन परिस्थितीत काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पोलीस पाटील यांची पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.विकास पाटील, अध्यक्ष, रायगड पोलीस पाटील संघ