Bribe Case 
रायगड

Raigad Bribery Case | रायगड एसीबीचा मोठा 'धडाका'! महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

Raigad Bribery Case | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पथकाने रंगेहात पकडले

पुढारी वृत्तसेवा

  1. महावितरणचे सहाय्यक अभियंता योगेश देसाई रंगेहात पकडले

  2. ट्रान्सफॉर्मर इस्टिमेटसाठी १.५० लाखांची लाच स्वीकारताना कारवाई

  3. रायगड एसीबीने खालापूर येथे सापळा रचला

  4. सुरुवातीला १.७० लाखांची मागणी, तडजोडीनंतर रक्कम कमी

  5. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 जाहीर

रायगड : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मंगळवारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या चौक सेक्शन-२ कार्यालयातील सहाय्यक अभियंता योगेश ताकाजी देसाई (वय ४०) यांनी ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचे इस्टिमेट तयार करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराचा पाली बुद्रुक येथे व्यावसायिक गाळा असून त्या ठिकाणी २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता.

या कामासाठी आवश्यक असलेले इस्टिमेट तयार करून देण्यासाठी योगेश देसाई यांनी सुरुवातीला १ लाख ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचे सांगितले जाते. तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर तडजोड होऊन १ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले.

दरम्यान, तक्रारदाराने ५ मार्च २०२६ रोजी रायगड-अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली. एसीबीने या तक्रारीची ९ मार्च रोजी पडताळणी केली असता सहाय्यक अभियंता देसाई यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी खालापूर येथील महावितरण कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ठरलेली १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश देसाई यांना पथकाने रंगेहात पकडले.

ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रायगड एसीबीचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT