

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अधिवेशनाच्या विधानसभा पहिल्या दिवशी झालेल्या प्रकारात माझी काहीच चूक नव्हती. मात्र, सभापतींनी मला २४ तासांच्या आत माफी मागण्यास सांगितल्याने त्यांचा आणि सभागृहाचा मान राखून मी झालेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी घेऊन माफी मागतो. मात्र, या प्रकरणी मला विश्वासात न घेता माझ्या माघारी सर्व चौकशी पार पाडल्याने निर्णय मला मान्य नाही, असे प्रतिपादन आमदार विजय सरदेसाई यांनी केले.
आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभा प्रेक्षक गॅलरीत मिराबाग येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनाच्या घटनेप्रकरणी मंगळवारी दुपारच्या सत्रात सभागृहात बिनशर्त माफी मागितली. सभागृहाने दिलेल्या २४ तासांच्या मुदतीपूर्वीच त्यांनी ही माफीनामा सादर केली.
ते म्हणाले की, या आंदोलनामागील उद्देशाबद्दल मला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. आमदार म्हणून नागरिकांना विधानसभा पाहण्यासाठी पास देण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. मात्र, पास दिलेल्या व्यक्तींच्या वर्तनाची पूर्ण जबाबदारी आमदारांवर टाकणे योग्य नाही.
माझ्या कार्यालयामार्फत पास देण्यात आले असले तरी संबंधित व्यक्ती सभागृहात अशा प्रकारची कृती करतील, याची मला कल्पना नव्हती. या घटनेबाबत चौकशी व्हावी, अशी माझी भूमिकाही आहे. तथापि, पास माझ्या कार्यालयातून दिले गेले असल्यामुळे मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असे ते म्हणाले.
मी माझे काम करणारच : सरदेसाई
माध्यमांशी संवाद साधताना झालेल्या प्रकारानंतर इथून पुढे कुणाला पासेस देणार की नाही असे विचारले असता, भविष्यातही स्थानिक नागरिकांना विधानसभा पाहण्यासाठी पास देणे थांबवणार नाही. नागरिकांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद करताना आपले काम आपण सुरूच ठेवणार असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
...तर दुसऱ्याच्या नावाने दिले असते पास :
प्रेक्षक गॅलरीत मिराबाग नागरिकांच्या कृत्याचा आरोप जरी माझ्यावर टाकला असला तरी जर मला हा प्रकार घडवून आणायचा असता, किंवा तसा माझा हेतू असता तर मी माझ्याच नावाने त्यांना पास का दिले असते? दुसऱ्या आमदारांच्या नावे पासेस घेण्यास सांगून त्यांना असे कृत्य करण्यास सांगू शकलो असतो, असेही स्पष्टीकरण सरदेसाई यांनी दिले आहे.