रोहे : महादेव सरसंबे
सुसंस्कृत तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्याची ओळख. या रोहा तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या तालुक्याला अध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. याची साक्ष आजही तालुक्यातील प्राचीन मंदिरे देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अवचितगडाच्या पायथ्याशी अनेक पुरातन मंदिरे आहेत. त्यातीलच नवसाला पावणारी भातसई येथील महादेवी माता मंदिर होय.
भातसई हे निसर्गाच्या कुशीत वसलेले टुमदार गाव होय. महाराष्ट्रात जी आदर्श गावे नावारूपास आली त्यातीलच भातसई हे गाव होय. गावातील श्री महादेवीचे जागृत देवस्थान आहे. या देवस्थानची जुनी अख्यायिका सांगितली जाते. निसर्गाने व्यापलेल्या डोंगरकुशीत हे गाव वसलेले आहे. या गावात डोंगरलगत तळ्याजवळ मिटकेश्वर म्हणून जागृत देवस्थान आहे. येथे देवीचा मानपान पूर्वी ग्रामस्थ करीत असत. देवीच्या आख्यायिकामध्ये गावातील गुराखी आपल्या गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला असता एका करवंदीच्या झुडपापाशी त्याला अवतरलेली देवी दिसली. नंतर ती अदृश्य झाली. परंतु नंतर ही श्री महादेवी माता सध्याच्या देवळाजवळ एका माळावर स्वयंभू देवीच्या रूपाने प्रकट झाल्याचे सांगितले जाते.
पुढे या देवीला महादेवी असे ओळखू लागले. ही देवी भातसई येथील खरिवले घराण्यातील लोकांच्या व भक्तांच्या अंगामध्ये खेळते. पूर्वी भातसई व आजूबाजूच्या गावात रोगराई संकटकाळी रक्षण करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास महादेवी आपला भाऊ श्री धावीर महाराज यांच्याबरोबर फिरत असत असे ग्रामस्थ सांगतात. ही मूळ देवी पूर्वी भवानी म्हणून ओळखली जायची श्री महादेवीचे 1907 साले नवीन मंदिर गावकर्यांनी श्रमदानातून बांधले. ही देवी खरीवले घराण्यातील भक्तगणांच्या अंगात संचारत असते. परंतु मध्यंतरी शासनाने ही परंपरा (सुमारे सन 1950) बंद करण्याचे ठरवल्यानंतर कार्यक्रम ठिकाणी गावात पोलीस आले होते.
यावेळी महादेवीचा साक्षात्कार झाल्याने ही परंपरा बंद न पडता पुढे आज पर्यंत चालू आहे. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी देवीची आरास केली जाते. दिमाखदार पारंपरिक वाद्यवृंदावर पालखी काढली जाते. हा पालखी सोहळा संपूर्ण भातसई, कोपरा, झोळांबे, लक्ष्मीनगर आदी पंचक्रोशीतील गावांमध्ये ढोल ताशाच्या गजरात देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. यात्रेच्या दिवशी परिसरातील महादेवाच्या काठ्या ताशा, खालुबाजा या पारंपारीक वाद्यांवृदावर गळ टोचणी या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी मंदिरात येतात.
नवरात्रात भाविकांची गर्दी
नवरात्र निमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने श्री महादेवीचा जागर केला जातो. सध्या गावांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ या जागरण निमित्ताने आपली सेवा रुजू करीत आहेत. भजन कीर्तन विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम घेतले आहेत. नवरात्र निमित्ताने मंदिर सजवले आहे. मोठ्या प्रमाणात भक्तगण मातेच्या दर्शनासाठी येत आहेत आपला नवस बोलून मातेची ओटी भरताना भाविक दिसतात.