

खोपोली ः प्रशांत गोपाळे
यंदाच्या खरिप हंगामात पावसाने मोठा कहर केला असला तरी, शेतकरी राजाने मोठे परिश्रम घेत आपली पारंपरिक शेती टिकवण्याचा प्रयत्न केल्याचे खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाहायला मिळाले. तर तालुक्यातील ग्रामीण भागात भात शेती बहारायला सुरुवात झाल्याने भाताच्या लोंब्या आता शेतात डौलाने डोलू लागल्याने शेतकरी राजा आनंदित असल्याचे पाहायला मिळत असून पावसाने पुढील काळात कृपादृष्टी दाखवत शेतीला पूरक पाऊस बरसावा अशी अपेक्षा शेतकरी राजा करीत आहे.
गेल्या दोन - तीन वर्षापासून होत असलेल्या अनियमित पावसामुळे येथील शेतकर्यांना भात पिकाचे उत्पादन घेणे जिकरीचे बनले असताना यावर्षी पावसाने मोठी बरसात करत मे महिन्यापासूनच दमदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला होता. भात पेरणी करणे ही नामूसकी बनली असता शेतकर्यांनी मोठी शर्तीचे प्रयत्न करत आपली पारंपारिक शेती टिकवण्यासाठी काहींनी तर दुपार भात पेरणी केली. अशा अनेक संकटांवर मात देत शेतकर्यांनी आपली भात पिक शेती टिकवली असता आता भात शेती डौलाने डौलू लागल्याने भाताची कणसे तयार व्हायला सुरुवात झाल्याने शेतकरी राजा आनंदित झाला आहे.
खालापूर तालुक्यातील सर्वच ठिकाणची भात शेती हिरवीगार बहरुन गेली आहे़. गेले काही दिवस उसंत घेणारा वरुण राजा आता अधून - मधून पावसाच्या सरी व उबदार ऊन देत आहे, जास्त पाउस नाही व जास्त उघडीप देखील नाही जणू काही उन - पावसाचा खेळच चालू असल्यासारखे वातावरण सध्या अनुभवास मिळत असून ते भात शेतीला अत्यंत पोषक ठरत असल्याने भातशेती बहरु लागल्याने शेतकरी राजा समाधान व्यक्त करत आहे.
खालापूर तालुक्यात सर्वात जास्त तांदूळ पिक पिकवले जात असुन यावर्षी अनेक संकटांवर मात करत शेतकर्यांनी भात लागवड केल्याने आता भात शेती बहरली असल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. खालापूर तालुक्यातील चौक, केलवली, माडप, वावोशी, खानाव, उंबरे डोनवत,करंबेली, खरीवली,सावरोली धामणी, या भागातील परिसरात भातशेती डौलाने बहरली असून बळीराजा सुखावला आहे. तर शेतकर्यांनी कोलम, दप्तरी, रत्ना, जया, अवनि, वैष्णवी, कर्जत 3 अशा विविध प्रकारच्या जातीच्या भातपिकाची लागवड केली आहे. आता भात पीक बहरायला लागला असून भाताच्या लोंब्या फुलायला सुरुवात झाली आहे.
संकटांवर मात करत भातशेती
खालापूर तालुक्यात सर्वात जास्त तांदूळ पिक पिकवले जात असुन यावर्षी अनेक संकटांवर मात करत शेतकर्यांनी भात लागवड केल्याने आता भात शेती बहरली असल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.