महाड : महाड शहरातील काही भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने शहरातील सुमारे 40 टक्के परिसरातील पाणीपुरवठा सध्या पूर्णतः ठप्प झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे.
महाड शहराला एमआयडीसी, कोथुर्डे व कुर्ले धरण अशा तीन जलयोजनांतून पाणीपुरवठा केला जातो, मात्र यापैकी सर्वात जुनी असलेली कोथुर्डे धरणाची जलवाहिनी सुमारे तीस वर्षांपूर्वीची असून, कालांतराने या जलवाहिनीत सातत्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. सध्या किल्ले रायगड रस्त्यालगत नाते गावच्या हद्दीत ही जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सद्यस्थितीत दुरुस्तीचे काम सुरू असले तरी हे काम पूर्ण होण्यास नेमका किती कालावधी लागेल, हे सध्या निश्चितपणे सांगता येत नसल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येत आहे. तथापि, अंदाजे दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याठिकाणी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर व त्यांचे सहकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत. सध्या एमआयडीसी व कुर्ले धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून, संपूर्ण शहराला पाणीपुरवठा नियोजनबद्ध पद्धतीने करता यावा यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे संकेत नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, महाड शहरात नवीन जलवाहिनी योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच कुर्ले, कोथुर्डे व एमआयडीसी येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे कामही नगरपरिषद प्रशासनाने हाती घेतले आहे. मे महिन्याच्या अखेरीस कोथुर्डे धरणाच्या जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर यांनी दिली आहे.
नुकतेच 2 जानेवारी रोजी महाड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) चे सुनील कविस्कर यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपैकी प्रमुख असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येला त्यांना सामोरे जावे लागत असून, आगामी काळात ते व त्यांचे सहकारी ही समस्या कशा पद्धतीने सोडवतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करीत आहेत, मात्र रहिवासी भागातून भूमिगत असल्याने या जलवाहिनीची गळती शोधणे तसेच दुरुस्ती करणे अत्यंत अडचणीचे ठरत असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय गळती लागलेल्या ठिकाणी सध्या एक दुकान कार्यरत असल्याने नगरपरिषद प्रशासन व दुकानदार यांच्यात समन्वय साधून काम सुरू ठेवण्यात आले आहे.