महाड : महाड शहराला पाणीपुरवठा करणारी व कुर्ला धरणातून आलेली जलवाहिनी महाड शहराजवळून जाणाऱ्या सावित्री नदीतून टाकण्यात आली होती मात्र सावित्री नदीतून पूरस्थितीवर मात करण्यासाठी गाळ काढणाऱ्या ठेकेदाराने जेसीबी यंत्राच्या साह्याने ही पाण्याची पाईपलाईन फोडली होती.
मात्र याबाबत आत्ता पाटबंधारे विभागाने हात झटकून ही जबाबदारी आपले नसल्याचे लेखी पत्राद्वारे महाड नगर परिषदेला कळविले आहे. विभागाने या संदर्भात पाठवलेल्या पत्रानंतर महाडकर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून; यासंदर्भात आता या घटनेची जबाबदारी कोणाची असा सवाल उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी प्रशासनाला विचारला आहे.
सावित्री नदीतून आलेली जलवाहिनी गाळ काढणाऱ्या ठेकेदाराने फोडल्याने महाड शहरातील बाजारपेठ भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. या पाणीटंचाईमुळे स्थानिक नगरसेवक सुरज बामणे यांचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या कार्यालयातच वाद झाले होते यावरून महाड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.
याबाबत महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी ७/७/२०२६रोजी पाटबंधारे विभाग कोलाड यांना सावित्री नदीतील गाळ काढताना नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याबाबतलेखी पत्र सादर केले होते.
पाटबंधारे उपविभाग कोलाड यांनीनगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुनील कविस्कर यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की सावित्री नदीतील गाळ काढतअसताना महाड नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी वाहून गेली याबाबतचे पत्र उपविभागीय कार्यालयास प्राप्त झाले आहे तरी सदर पत्रातील नमूद काम हे या उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येत नसून सदर काम हे या उपविभागाशी संबंधित नाही असे लेखी पत्र सादर केले आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या या पत्राने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महाड जवळून जाणाऱ्या सावित्री नदीसह पोलादपूर तालुक्यातील गांधारी ,काळ,नागेश्वरी, मल्लिकार्जुन,यासह दोन्ही तालुक्यातील छोट्या-मोठ्या नद्या व ओढ्यांमधून तब्बल १५० जणांना नदीतून गाळ काढण्याच्याऑर्डर दिल्या होत्या त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी सावित्री नदीपात्रातील कुर्ला धरणातून आलेली महाड शहरात जाणारीमुख्य जलवाहिनीजवळ गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागाच्या आदेशाने चालू होते.
नक्की जबाबदारी कुणाची : उपनगराध्यक्ष
पाटबंधारे विभागाने दिलेल्या लेखी पत्रामुळे आता पाटबंधारे विभागाने जबाबदारी नाकारली असेल तर नक्की जबाबदारी कुणाची? रायगड पाटबंधारे उपविभागाने महाड नगर परिषदेला पाठवलेल्या पत्रामुळे सावित्री नदीपात्रातून गाळ काढण्याचे कामाला मंजुरी देण्याचे काम पाटबंधारे विभाग कोलाड यांनी केले आहे. तसेच ज्या ठिकाणी जलवाहिनी वाहून गेली त्या ठिकाणी नदीपात्रातून रेजगा काढण्याचे काम देखील पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादाने चालू होते असे असताना संबंधित जलवाहिनी फोडण्याचे काम ज्या ठेकेदाराने केले तो ठेकेदार पाटबंधारे विभागाने नियुक्त केलेला असताना आज पाटबंधारे विभागाने पाठवलेल्या पत्रामुळे नदीपात्रातील रेजगा काढण्याची जबाबदारी व नक्की कोणाची होती असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी पाटबंधारे विभागाला विचारला आहे.
नगर परिषदेने यापूर्वीच संबंधित घटने संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे विस्तृत प्रमाणात आपली तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडून चौकशीची मागणी केली आहे . त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या संदर्भातील पत्रव्यवहाराची प्रत प्राप्त झाल्यानंतरच अधिक भाष्य करणे योग्य होईल.धनंजय कोळेकर मुख्याधिकारी