महाडः सांगली जिल्ह्यातील हातनूर परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या महाड तालुक्यातील मजुरांच्या टोळीने दोन मोरांची शिकार केली, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळ या टोळीला रंगेहात पकडून वनविभाग आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेनंतर महाडमध्येही अशीच अवैध शिकार सुरू आहे काय?, असा सवाल उपस्थित होत आहे.
महाड तालुक्यातून सहा जणांची ऊसतोड मजुरांची टोळी तासगाव तालुक्यातील हातनूर परिसरात आली होती. आठवडाभरापूर्वीपासून या मजुरांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने ग्रामस्थांनी लक्ष ठेवले. शनिवारी रात्री अजित सोनटक्के यांच्या शेताजवळ झाडावर बॅटरीचा प्रकाश दिसल्याने ग्रामस्थ सजग झाले. क्षणाचाही विलंब न करता सुमारे 25 शेतकरी व ग्रामस्थांनी या टोळीला घेरले. चौकशीत त्यांनी दोन मोरांची शिकार केल्याचे स्पष्ट झाले.
ग्रामस्थांनी तात्काळ वनविभाग आणि तासगाव पोलिसांना कळविले. मध्यरात्री उपवनसंरक्षक सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने वामन जाधव (वय 36 रा. कुंभार्डे, ता. महाड ), रत्नाकर पवार (वय 39 रा. आंबिवली, ता. महाड), किशोर पवार (वय 22 रा. सापेगाव, ता. महाड), सचिन वाघमारे (वय 23), सत्यवान वाघमारे (वय 21) आणि नितीन वाघमारे (वय 20) (तिघे रा. चोचिंदे, ता. महाड) यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळी मोरांची पिसे, लगोर, बॅटरी आदी शिकारीची साधने जप्त करण्यात आली असून, आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने ग्रामस्थांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. गावकऱ्यांनी दाखवलेली जागरूकता आदर्श ठरेल, असे अधिकारी म्हणाले.
वनसंवर्धनावर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर वनसंवर्धनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हातनूरसारख्या भागात महाडहून आलेल्या मजुरांकडून शिकार होत असेल, तर महाड परिसरातही अशीच शिकार होत असावी अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. या प्रकरणातून महाड व आसपासच्या भागात वन्यजीव संरक्षणाबाबत अधिक कडक नजर ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.