Savitri River  pudhari photo
रायगड

Raigad Tourism : सावित्री-गांधारी नदी परिसरात रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग

पर्यटनसमृद्ध महाडमधून स्थलांतराला लगाम शक्य; शासनस्तरावर नियोजनाची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

2021 च्या महाड पोलादपूर मधील महाप्रलयानंतर सावित्री काळ गांधारी नदी पात्रातील काढलेला गाळ व त्या नमित्ताने समोर आलेल्या विविध नवीन पर्यटनाच्या संधी लक्षात घेता या परिसरातून रोजगार निर्मिती करण्यासाठी पर्यटन क्षेत्र समृद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत असून या क्षेत्रातील मान्यवरांकडून महाड पोलादपूर परिसर पर्यटन समृद्ध झाल्यास स्थलांतरीला लगाम घालता येईल असे आग्रही मत व्यक्त होत आहे.

मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या मतदारांच्या नव्याने नोंदणी संदर्भात प्राथमिक स्तरावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड पोलादपूर तालुक्यात ग्रामीण भागातून मुंबई पुणे सुरत बडोदा अहमदाबाद या ठिकाणी गेलेल्या स्थलांतरित मतदार बांधवांची संख्या लक्षणीय आहे प्राप्त झालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार आगामी निवडणुकीमध्ये या स्थलांतरामुळे मयत अथवा दुबार मतदारांमुळे चाळीस हजार पेक्षा जास्त नावे कमी होण्याची शक्यता आहे यात स्थलांतरांचे प्रमाण लक्षात घेता हे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून स्थानिक पातळीवर विविध पद्धतीचे उपाय विविध शासनाच्या योजना अंतर्गत करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोजगाराच्या शोधात महाडमधील तरुणांना मुंबई, पुणे आणि अन्य मोठ्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मर्यादित संधी, पर्यटन क्षेत्राचा अपुरा विकास आणि व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे महाडमधील तरुणाईला बाहेरचा रस्ता धरावा लागत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर महाडला केवळ औद्योगिक शहर म्हणून नव्हे, तर पर्यटनसमृद्ध शहर म्हणून विकसित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

महाडला ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा मोठा वारसा लाभला आहे. चवदार तळे, किल्ले रायगड, सावित्री नदी आणि परिसरातील निसर्गसौंदर्य यामुळे पर्यटन विकासाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. मात्र, या संधींचा नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग झालेला दिसत नाही. त्यामुळे महाडच्या पर्यटन विकासासाठी शासनाने आता ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

सावित्री आणि गांधारी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामामुळे पूरनियंत्रणाला मदत होण्याची अपेक्षा आहे. महापुराचे संकट कमी करण्याच्या उपाययोजनांबरोबरच या दोन्ही नद्यांच्या काठांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची संधीही उपलब्ध होऊ शकते. नदीकिनारी आकर्षक उद्याने, पदपथ, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, पर्यटकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे आणि सुरक्षित पर्यटन सुविधा निर्माण करता येतील. पर्यावरणीय अभ्यासानंतर नौकाविहारासारख्या उपक्रमांचाही विचार करता येईल.

पर्यटन वाढले तर हॉटेल व्यवसाय, स्थानिक खाद्यपदार्थ, वाहतूक व्यवस्था, पर्यटन मार्गदर्शक, हस्तकला, स्थानिक उत्पादने आणि लघुउद्योगांना चालना मिळू शकते. महिला बचतगट आणि स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे, महाडमध्येच रोजगार उपलब्ध झाल्यास तरुणांचे मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर कमी करण्यास मदत होईल.

यासाठी शासनाने सावित्री-गांधारी नदीकाठ पर्यटन विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा. चवदार तळे, रायगड किल्ला आणि नदीकाठचा परिसर यांना जोडणारे पर्यटन सर्किट विकसित करण्यावर भर द्यावा. स्थानिक नागरिकांचा सहभाग घेऊन पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य द्यावे.

  • महाडला केवळ महापुराच्या संकटातून बाहेर काढणे नव्हे, तर रोजगार, व्यवसाय आणि पर्यटनाच्या संधींनी समृद्ध करणे हेही विकासाचे उद्दिष्ट असले पाहिजे. तरुणांचे स्थलांतर रोखायचे असेल, तर महाडमध्येच रोजगाराची दारे उघडावी लागतील. सावित्री-गांधारीच्या तीरावर पर्यटनाचे नवे पर्व सुरू झाले, तर महाडच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळू शकते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT