श्रीकृष्ण बाळ
महाड: महाड शहराच्या जुना पोस्ट परिसरात संजय ऑईल कंपनीच्या गोदामाला 27 मे रोजी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. मात्र चार दिवसानंतरही आगीच्या झळा समोर येत आहेत. यात ज्वलनशील पदार्थ असल्यानेच आग चार दिवसानंतरही पुन्हा तीव्र होत असल्याने अग्निशमन दलाने येथील संबंधितांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
28 मे व त्यानंतर 30 मे शनिवार रोजी सायंकाळी साडेसहा व रात्री बाराच्या सुमारास पुन्हा आग लागल्याने ती विझवण्यासाठी महाड पालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थ केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
महाड शहराच्या इतिहासातील 100 वर्षात एवढी भीषण आग लागली नसल्याची चर्चा महाडकर नागरिक करीत आहेत. या आगीमुळे शेजारील घरांच्या झालेल्या नुकसानीसह नुकसानीचा प्राथमिक अंदाज हा सुमारे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची माहिती शासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ही सर्वात मोठी आग विझवण्या कामी सहा अग्निशमन बंबांनी 25 वेळा प्रयत्न केले. सात तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी साडेसात वाजता 28 मे रोजी ही आग नियंत्रणात आली होती. या आगीमध्ये ज्वलनशील पदार्थच असल्याने आगीची तीव्रता आजही कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या ठिकाणाहून जेमिनी तेल एवरेस्ट मसाले व सेऊल माचीस मोठा साठा नागरिकांनी आगीची तीव्रता वाढण्यापूर्वी या गोदामातून मोठ्या प्रमाणात समोरील साठेवाड्यामध्ये नेऊन ठेवल्याचे सकृत दर्शनी असलेल्या नागरिकांनी पाहिले आहे. यामुळे या ज्वलनशील पदार्थ असल्यानेच आग चार दिवसानंतरही पुन्हा तीव्र होत असल्याने अग्निशमन दलाने येथील संबंधितांना याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले .
भविष्यातील धोक्याची घंटा
या आगीने महाड शहराच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये अनेक नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावर स्थानिक प्रशासन, नगरपालिका, पोलीस यंत्रणा किती दिवसात निर्णय घेते व त्याची माहिती सर्वसामान्य महाडकर जनतेला कधी प्राप्त होते, याकडे महाडकर जनतेचे लक्ष लागले आहे.