

राजकुमार भगत
उरण: उरण तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणीपातळी अत्यंत चिंताजनक पातळीवर खालावली आहे. धरणातील पाणीसाठा संपत आल्याने आता थेट मृत साठ्यातून (डेड स्टॉक) पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे.
सध्या धरणात अवघे काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यंदा धरणाची पाणीपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 10 फुटांनी खालावली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 24 दिवस आधीच धरणाने तळ गाठला आहे.त्यामुळे उरण तालुक्यापुढे पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
निसर्गरम्य डोंगरकपारीत 1970 च्या दशकात बांधलेले हे रानसई धरण सुमारे 6.8 चौरस कि.मी. क्षेत्रात पसरलेले असून, त्याची एकूण पाणी साठवण क्षमता 10 दशलक्ष घनमीटर आहे. उरण तालुक्यातील 24 ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद यांसह ओएनजीसीआणि बीपीसीएल सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांची तहान या धरणावर अवलंबून आहे.
गेल्या काही वर्षांत उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने झाल्याने येथील पाण्याची मागणी वाढली असून, दररोज सुमारे 40 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. मात्र, गेल्या वर्षी पावसाने लवकर काढता पाय घेतल्यामुळे धरणातील जलसाठा वेगाने आटला.
सद्यस्थितीत धरणाची पातळी 85 फुटांच्या खाली गेली आहे. वास्तविक पाहता 87.5 फुटांवर पातळी आली की मृत साठ्यातून पाणी सुरू होते, त्यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
उरणची रोजची 40 एमएलडी पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सिडकोने हेटवणे धरणातून दररोज 4 एमएलडी पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यातील नागरिकांना 30 जूनपर्यंत पाणी पुरवण्याचे नियोजन एमआयडीसी करत आहे. सध्या रानसई धरणातून 36 एमएलडी आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून 4 एमएलडी असे मिळून उरणकरांची गरज भागवली जात आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठा पुढील महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी तालुक्यात आता मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाणी अत्यंत जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
- ज्ञानदेव सोनावणे,एमआयडीसीचे उपअभियंता