महाडः महाड नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीची शहरवासियांनाआता उत्सुकता लागली आहे.नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असले तरी 12 जागा जिंकून राष्ट्रवादी,भाजपने सभागृहात वर्चस्व मिळविलेले आहे. उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी नगराध्यक्ष सुनिल कविस्कर काही तरी चमत्कार करतील अशी शक्यता होती मात्र राष्ट्रवादी भाजप युतीतील एकही नगरसेवक त्यांना फोडता न आल्याने अखेरच्या क्षणी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद महाडीक यांना माघार घ्यावी लागली आणि युतीचे संदीप जाधव यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
राष्ट्रवादी भाजप युतीने बहुमताच्या जोरावर उपनगराध्यक्ष पद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले त्यामुळे काही दिवसाने होणाऱ्या विषय समिती सभापतीच्या निवडीचे वेळी युतीची भूमिका हीच कायम राहणार की सत्ताधारी विरोधकांच्यातील सामंजस्याने काही विषय समित्यांचे सभापती पद शिवसेनेकडे देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विद्यमान सभागृहात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी भाजप युती असे समिकरण असले तरी केंद्रात व राज्यात हे तीनही पक्ष महायुतीतील घटक पक्ष आहेत. त्यामुळे महाड शहराच्या विकासासाठी या तीनही पक्षांनी हातात हात घालून काम करणे अपेक्षित आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष सुनिल कविस्कर व राष्ट्रवादी भाजप युतीचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव हे दोघेही अनुभवी आहेत. प्रशासकीय कामाचा त्यांना गाढा अभ्यास आहे.
याखेरीज सभागृहात शिवसेनेचे प्रमोद महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे वजीर कोंडीवकर वगळता सर्व नगरसेवक नवखे आहे. पालिका कामकाजाचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे विषय समिती सभापतीपद व सदस्यांची निवड करताना सत्ताधारी व विरोधी गटाला या सर्व बाजुंचा विचार करावा लागणार आहे. विषय समित्यांचे सभापतीपद कुणाकडेही गेले तरी त्यावर नियंत्रण हे स्थायी समितीचे अध्यक्ष पद भुषवणाऱ्या नगराध्यक्षांचे असणार आहे. मात्र तरीही विरोधी पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत हे स्पष्ट दिसून येत आहे.
महाड नगर परिषदेतील पक्षीय बलावल पाहता सत्ताधारी अथवा विरोधी पक्षाला आपली मनमानी करता येणार नाही. सभागृहात सर्वाना पटेल असेच जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
असाच प्रसंग महाड नगर परिषदेमध्ये सुमारे पन्नास वर्षांपूर्वी स्वर्गवासी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आला होता त्यावेळेलाही सभासद संख्येमध्ये विरोधी असलेल्या स्वर्गवासी दादासाहेब सावंत यांच्याकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर तांत्रिक घडलेल्या घटनेचा संदर्भ घेत नगराध्यक्ष नानासाहेब पुरोहित यांना काम करणे अशक्य होऊन अखेरीस त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.