महाड: 5 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या महाड औद्योगिक वसाहती मधील वायुगळतीमध्ये दोन कामगारांचा बळी आणि सुमारे 60 हून अधिक कामगारांना वायू गळतीतीची बाधा पोहोचविणारी महाड एमआयडीसी मधील इंडो अमाइन्स ही वादग्रस्त कंपनी काही अटी व शर्तीवर पुन्हा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने दिल्याने परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ही कंपनी पूर्णपणे बंद करण्यास यावी अशी मागणी ग्रामस्थांची असतानाही कंपनीला पुन्हा परवानगी देण्यात आल्याने महाड औद्योगिक क्षेत्रातील पर्यावरणाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये आसनपोई या गावानजीक बाधा पोहोचविणारी इंडो अमाइन्स ही अत्यंत धोकादायक कंपनी उभारण्यात आली आहे. 15 ऑगस्टला या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्याने या कारखान्यातील एक तर शेजारील कारखान्यातील अन्य कामगार मृत्युमुखी पडला होता, तर या कंपनीतील व आजूबाजूच्या कंपनीमध्ये तसेच काही ग्रामस्थ अशा एकूण 66 जणांना या वायुची बाधा झाली परंतु सुदैवाने या सर्वांना उपचारानंतर बरे वाटले.
या कारखान्यांमध्ये घटना घडण्यापूर्वी अन्य ठिकाणी असणारी हीच कंपनी तेथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केली होती. ती कंपनी सुरू करण्याच्या आदेश दिल्यानंतर महाड येथील कंपनीमध्ये अपघात घडला त्यामुळे सुरक्षिततेच्या बाबतीत ही कंपनी फारशी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांबरोबर गुन्हा दाखल करण्यात आला तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते.
या कंपनीमध्ये टेट्राबुटील युरिया याचे उत्पादन केले जाते परंतु हे उत्पादन वगळून इतर औद्योगिक कामकाजाला परवानगी मिळावी अशी विनंती सादर केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण विभागाच्या मुख्य कार्यालयाने हे उत्पादन वगळून इतर कामकाजाचा परवानगी अटी व शर्तीवर दिले असल्याचे समजते.
उत्पादन पुन्हा सुरू करण्यापूर्वी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. वायु प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सतत आणि प्रभावीपणे कार्यरत ठेवावी लागणार आहे.
कंपनीची दोन लाखाची जुनी बँक हमी रद्द करण्यात आली असून नवीन चार लाख रुपयांची बँक हमी जमा करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. दोन कामगारांच्या मृत्यू प्रकरण, 66 कामगार व ग्रामस्थांना जखमी करणाऱ्या या कारखान्याला अत्यंत माफक अटींवर पुन्हा परवानगी देण्यात आल्याने कामगार व परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.