महाड शहरातील अनेक सखल भागांत पुराचे पाणी शिरले Pudhari
रायगड

Mahad Floods | महाडमध्ये सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांना पूर; ४ दिवसांत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शहरात

पोलादपूर तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Raigad Flood Update

महाड : महाड शहरात गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सावित्री, काळ आणि गांधारी या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत असून मुसळधार पावसामुळे व्यापारी, नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पुढील ४८ तासांतही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने महाड तसेच शेजारील पोलादपूर तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जून महिन्यात उशिरा सुरू झालेल्या पावसाने जूनअखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावली. आतापर्यंत सरासरी पावसाच्या जवळपास निम्मा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी अतिवृष्टीमुळे नुकत्याच झालेल्या पेरण्या धोक्यात येण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी पहाटे महाड शहरातील अनेक सखल भागांत पुराचे पाणी शिरले. शहरातील विविध भाग जलमय झाल्याने दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, महाड–मुंबई राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू झाल्याची माहिती स्थानिक प्रशासन आणि एसटी महामंडळाने दिली आहे. मात्र आंबेनळी, भोर आणि ताम्हिणी घाट बंद असल्याने या मार्गांवरून येणारे दूध टँकर आणि भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संभाव्य अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने मंगळवारी सायंकाळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. गेल्या वीस वर्षांत प्रथमच सलग चार दिवसांत तीन वेळा महाड शहरात पुराचे पाणी शिरल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक यापूर्वीच महाडमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये तातडीने मदतकार्य करणे शक्य झाले असून ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रशासन आणि शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT