श्रीकृष्ण बाळ
महाड: महाड शहर आणि परिसराला हादरवून सोडणाऱ्या महाप्रलयाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. २२ जुलै २०२१ हा दिवस महाडकरांच्या स्मरणातून कधीही पुसला जाणार नाही.
मुसळधार पाऊस, सावित्री व गांधारी नद्यांना आलेला महापूर आणि तळीये गावावर कोसळलेली भीषण दरड यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता. या नैसर्गिक आपत्तीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, तर तळीये येथील दुर्घटनेत तब्बल ८७ जणांचा मृत्यू झाला.
महाड शहरात शंभर वर्षांतील सर्वात मोठा पूर आल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. शहरातील बाजारपेठ, घरे, दुकाने, शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांमध्ये पाणी शिरले होते. हजारो कुटुंबांचे संसार वाहून गेले. वाहनांचे, शेतीचे आणि व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेक दिवस शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
या संकटाच्या काळात महाडच्या तरुणाईने दाखविलेली धाडस आणि सामाजिक बांधिलकी आजही प्रेरणादायी ठरते. जीवाची पर्वा न करता अनेक युवकांनी बोटी, दोरखंड आणि स्थानिक साधनसामग्रीच्या मदतीने शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
पूरग्रस्त भागात अडकलेल्या वृद्ध, महिला आणि लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनीही या कार्यात मोलाचे योगदान दिले. तळीये गावातील दरड दुर्घटना ही या आपत्तीतील सर्वात वेदनादायी घटना ठरली.
काही क्षणांत संपूर्ण वस्ती मातीखाली गाडली गेली आणि अनेक कुटुंबे कायमची उद्ध्वस्त झाली. बचाव पथकांनी अनेक दिवस अथक शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शोकमग्न केले होते. आजही त्या घटनेच्या आठवणी गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणतात.
पितृवियोगनांतरही धावली मदतीला कन्या
यच दरम्यान मुंबईमध्ये कोरोनाशी झुंज देणाऱ्या माजी आमदार माणिकराव जगताप यांचे महाडकरांवर आलेल्या या संकटकाळात देखील रुग्णालयातून स्थानिक कार्यकर्ते व शासनाला मार्गदर्शन करीत होते. मात्र त्यांची कोरोनाशी असलेली झुंज 26 जुलै रोजी अपयशी ठरली. त्यांचे अकाली निधन झाले.
नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कुटुंबावर आलेल्या या महा आपत्तीला सामोरे जातानाच तत्कालीन नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवत २४ तासात महाडकर नागरिकांच्या सेवेसाठी धावून जाण्याचा घेतलेला निर्णय महाडची जनता आजही विसरलेली नाही.
तत्कालीन शासनाची मदत ठरली महत्त्वपूर्ण!!
2021 च्या या महाप्रलयकारी आपत्तीमध्ये तळीये गावावर आलेल्या संकटाची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावाला भेट देऊन तेथील नागरिकांसाठी शासनाच्या अंगीकृत असणाऱ्या म्हाडा यंत्रणेमार्फत नवीन घरांची घोषणा केली होती. आज त्या 278 घरांपैकी जवळपास 90 पेक्षा जास्त घरांचे लोकार्पण करण्यात आले असून बाकी कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील असे म्हाडा यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
निवारा शेडचे काम अपूर्ण
महाप्रलयाला पाच वर्षे पूर्ण झाली असली, तरी आपत्तीच्या काळात नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी निवारा शेडच्या कामांना अद्याप पूर्णत्व आलेले नाही. अतिवृष्टी, पूर किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळावा, या उद्देशाने प्रस्तावित करण्यात आलेल्या निवारा शेडची कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाच वर्षांचा कालावधी उलटूनही ही कामे रखडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.