

रायगड: रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत येणाऱ्या २८ लघु पाटबंधारे प्रकल्पांपैकी तब्बल २२ प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ९१.१६ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, एकूण ६३.०६३ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी साठवले गेले आहे. पाटबंधारे विभागाने २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम असून विविध धरण क्षेत्रांत चांगला पाऊस नोंदवला गेला आहे.
धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती
फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), आंबेघर (पेण), कोडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे (सर्व सुधागड), कडकी (श्रीवर्धन), पाभरे, संदेरी (म्हसळा), वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे (सर्व महाड), भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत (खालापूर) तसेच पनवेल तालुक्यातील मोरबे व बामणोली ही २२ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दुसरीकडे, अलिबागचे श्रीगाव धरण ७५ टक्के, कर्जतचे साळोख ५१ टक्के व अवसरे ५२ टक्के, श्रीवर्धनचे काले ५६ टक्के व रानीवली ३९ टक्के, तर उरणचे पुनाडे धरण ८७ टक्के भरले आहे.
२४ तासांतील पर्जन्यमान आणि विसर्ग
खालापूर तालुक्यातील डोणवत धरण क्षेत्रात तब्बल १९० मि.मी. आणि भिलवले येथे १५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ म्हसळा येथील संदेरी (१०० मि.मी.), खालापूरचे कलोते-मोकाशी (९५ मि.मी.), पनवेलचे मोरबे व बामणोली (प्रत्येकी ९० मि.मी.) आणि अलिबागच्या श्रीगाव क्षेत्रात ९० मि.मी. पाऊस झाला आहे. मोरबे धरणातून सर्वाधिक १७.३८ क्युमेक्स तर कोडगाव धरणातून ८.८१ क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
भिरा पिकअप धरण अपडेट
भिरा जलक्षेत्रात आज २९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून या हंगामातील एकूण पाऊस २६४२.२० मि.मी. वर पोहोचला आहे. धरणाचे तिन्ही मुख्य गेट सध्या बंद असून पाणीपातळी ९४.४० मीटरवर नियंत्रित ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाचा इशारा
रायगड पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाकडून सर्व नद्या व धरण क्षेत्रातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल रायगड जिल्हाधिकारी व ठाणे पाटबंधारे मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
प्रमुख नद्यांची पातळी व पूरस्थिती
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी सर्व नद्या सध्या धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. महाड येथील सावित्री नदीची पातळी ३.२० मीटर (धोका पातळी ६.५० मी., पाऊस ५४ मि.मी.), नागोठणे येथील अंबा नदी ७.२० मीटर (धोका पातळी ९.०० मी., पाऊस ५५ मि.मी.), रोहा डोलवहाल येथील कुंडलिका नदी २२.७० मीटर (धोका पातळी २३.९५ मी., पाऊस ४० मि.मी.), लोहप येथील पातळगंगा नदी १९.२५ मीटर (धोका पातळी २१.५३ मी., पाऊस ९५ मि.मी.), कर्जत येथील उल्हास नदी ४४.५० मीटर (धोका पातळी ४८.७७ मी., पाऊस ७५ मि.मी.) आणि पनवेल येथील गाढी नदी ३.५० मीटर (धोका पातळी ६.५५ मी., पाऊस ९० मि.मी.) पातळीवर वाहत आहे.