महाड : आपल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांच्या कथित जातीवाचक छळाला कंटाळून पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आत्महत्येचा इशारा देणारे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची अखेर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नुकताच संदीप अशोक भोसले यांनी महाड शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला असून काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्यांनी तेथेच त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे. घरातील कोणतीही पोलीस पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पोलीस दलात आपला ठसा उमटवला आहे.
भोसले यांना सुमारे 20 वर्षांचा पोलीस सेवेचा अनुभव आहे.
गडचिरोली या नक्षल प्रभावित भागात त्यांनी दीड वर्ष काम केले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण, नाशिक, नंदुरबार, नागपूर, सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 2017 पासून ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून सलग दहा वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांना 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस संचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
महाड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, आगामी शिवजयंती, होळी, चवदारतळे सत्याग्रह दिन तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक व जातीय सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करावे.संदीप भोसले, पोलीस निरीक्षक, महाड