Mahad Parking Problem Pudhari
रायगड

Mahad Parking Problem: महाड शहरात अधिकृत पार्किंगअभावी वाढती वाहतूककोंडी

ठिकठिकाणी फक्त नो पार्किंगचे फलक; स्वतंत्र पार्किंग व्यवस्थेसह वाहतूक आराखड्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: ऐतिहासिक व सामाजिक दृष्टीतून जागतिक नकाशावर गेलेल्या महाड नगर परिषदेने १५० पेक्षा जास्त वर्षे पूर्ण केली असून मागील काही वर्षात यामध्ये होणारी लोकसंख्येची वाढ व निर्माण होणारे सिमेंट काँक्रीटचे जंगल पाहता शहराचा भविष्यकालीन नियोजनात्मक आराखडा करणे अत्यावश्यक झाले आहे.

महाड शहरात अधिकृत पार्किंग नसल्याने रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीतही वाढ होत आहे.

सद्यस्थितीमध्ये महाड शहराच्या विविध मार्गांवर मुख्य बाजारपेठेसह नो पार्किंग चे फलक पहावयास मिळतात अनेक मुख्य मार्ग लगतच्या मार्गांवर लावण्यात आलेल्या दूध चाकी व चार चाकी गाड्यांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून गेल्या शंभर वर्षात पार्किंगची करण्यात न आलेली व्यवस्था ही सद्यस्थितीमध्ये जगाचे आठवे आश्चर्य मानले जात आहे.

विविध मार्गांवर व मुख्य ठिकाणी नो पार्किंगची सूचना देत असतानाच शहरात येणाऱ्या व शहरात राहणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे या प्रश्नाचे उत्तर मात्र आजपर्यंत नगरपरिषदेमधील निवडून आलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना व त्यांच्या नेत्यांना देता आलेले नाही हे वास्तव सर्वांनीच मान्य करावे लागेल.

हाड शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी संकुले आणि वर्दळीच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.

नागरिकांना खरेदीसाठी किंवा शासकीय कामांसाठी शहरात आल्यानंतर वाहन पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. अनेकदा रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महाड शहरातील पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

महाड हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असल्याने ग्रामीण भागातून दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी शहरात येतात. दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच मालवाहू वाहनांची वाढती संख्या उपलब्ध रस्त्यांवर अतिरिक्त ताण निर्माण करत आहे. त्यातच शहरातील अनेक भागांत स्वतंत्र पार्किंगची पुरेशी सुविधा नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिकच वाढत आहे.

विशेषतः बाजारपेठेच्या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी जागा मिळणे कठीण होत आहे. रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगमुळे पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालणे अवघड बनते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. ही बाब गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाड शहरात नियोजनबद्ध सार्वजनिक वाहनतळ, बहुमजली पार्किंग व्यवस्था, वाहतुकीसाठी एकेरी मार्ग, नो-पार्किंग क्षेत्रांची निश्चिती आणि वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. भविष्यातील वाहनसंख्या लक्षात घेऊन शहराचा स्वतंत्र वाहतूक आणि पार्किंग आराखडा तयार करणे ही काळाची गरज बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT