Raigad Mango Cashew Production: पोषक थंडीमुळे रायगडमध्ये आंबा-काजू पिक बहरणार; बागायतदारांच्या आशा पल्लवित

उत्पादनात होणार वाढ?; जिल्ह्यात आंब्याचे ४५ हजार तर काजूचे ४ हजार हेक्टर क्षेत्र
Raigad Mango Cashew Production
Raigad Mango Cashew ProductionPudhari
Published on: 
Updated on: 

कमलाकर होवाळ

माणगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात जाणवू लागलेला बदल आणि सकाळ-सायंकाळी वाढणारा गारवा यामुळे हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या बदलामुळे काहीसा दिलासा मिळत असतानाच आंबा आणि काजू बागायतदारांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात आंब्याचे सुमारे ४५ हजार हेक्टर तर काजूचे चार हजार हेक्टर क्षेत्र आहे. पोषक वातावरण राहिल्यास यावर्षी आंबा आणि काजू उत्पादनात वाढ होण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करीत आहेत.

Raigad Mango Cashew Production
Karjat Torrent Project Protest: कर्जतमध्ये टोरंटच्या प्रकल्पांविरोधात कॅण्डल मार्च; ३२ संघटना एकवटल्या

हापूस आंब्याच्या मोहोर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले थंड व कोरडे हवामान निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने यंदाच्या हंगामाबाबत बागायतदारांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. काजू पिकालाही अनुकूल हवामानाची साथ मिळाल्यास उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती निर्माण होऊ शकते.

रायगड जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकांचे भवितव्य बहुतांश प्रमाणात निसर्गाच्या लहरींवर अवलंबून असते.

Raigad Mango Cashew Production
Panvel Badlapur Tunnel: पनवेल-बदलापूर प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत; बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

अलिबाग, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, कर्जत यांसह रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत हापूस आंब्याच्या बागा विस्तारल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने बागायतदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा, काही भागांत दिसणारे धुके आणि रात्रीच्या तापमानातील घट यामुळे हिवाळ्याची चाहूल अधिक स्पष्ट होत आहे.

मात्र, केवळ थंडीची सुरुवात होणे पुरेसे नसून तिचे सातत्य आणि हवामानातील स्थिरता आंब्याच्या मोहोर प्रक्रियेसाठी निर्णायक ठरणार आहे. आंबा पिकामध्ये नवीन पालवी परिपक्व झाल्यानंतर योग्य प्रमाणात थंडी आणि कोरडे वातावरण मिळणे मोहोर निर्मितीसाठी पोषक ठरते.

त्यामुळे सध्या वाढू लागलेला गारवा बागायतदारां साठी आशेचा किरण ठरत आहे. यंदा पावसाचे प्रमाण, बदलते तापमान आणि हवामानातील अनिश्चितता यांचा परिणाम बागांवर जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अद्याप नवीन पालवी फुटण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मोहोर येण्यास विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत आगामी काळात थंडीचा जोर वाढून तो सातत्याने टिकून राहिल्यास मोहोर प्रक्रियेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आंब्या पाठोपाठ काजू हे ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित काजू उत्पादनावर अवलंबून असते. सध्या काही भागांत काजूच्या झाडांना नवीन पालवी फुटण्यासह मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा वेळी तापमानातील अनुकूलता, कोरडे हवामान आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे.

मात्र, हवामानातील अचानक होणारे बदल, ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्यास मोहोर आणि पुढील फळधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांचेही आगामी काही आठवड्यांतील हवामाना कडे लक्ष लागले आहे.

गेल्या हंगामात नैसर्गिक संकटे आणि हवामानातील अनिश्चितते मुळे आंबा-काजू उत्पादकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. उत्पादनातील चढ-उतार, दर्जावर होणारा परिणाम आणि बाजार भावातील अनिश्चितता यामुळे बागायतदारांचे आर्थिक गणितही विस्कळीत झाले.

दरवर्षी २२ हजार मेट्रिक टन आंब्याचे होते उत्पादन

रायगड जिल्ह्यात आंबा हे महत्त्वाचे फळपीक असून सुमारे ४२ ते ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २१ ते २२ हजार मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते. यामध्ये हापूस आंब्याला विशेष मागणी असून पायरी आंब्याचेही उत्पादन घेतले जाते.

अलिबाग, रोहा, मुरूड, महाड, माणगाव आणि श्रीवर्धन तालुक्यांत आंबा लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. आंबा उत्पादनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतार यांचा उत्पादनावर परिणाम होत आहे.

काजूचे ३ हजार मेट्रिक टनापर्यंत उत्पादन

रायगड जिल्ह्यात आंब्याप्रमाणेच काजू हे महत्त्वाचे बागायती पीक आहे. जिल्ह्यात काजू लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून आहे. उपलब्ध कृषी आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात सुमारे ४ हजार ३४२ हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड होती. त्यातून ३ हजार २८१ मेट्रिक टन उत्पादन मिळाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.