नाते : महाड तालुक्यातीळ तेटघर येथील बांधलेला सिमेंट काँक्रीट चा बंधारा पहिल्याच पावसाने जोर धरताच एका बंधाऱ्यालगतची शेतजमीन धुपून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संबंधित बंधाऱ्याच्या कामात ठेकेदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे. पाणी अडवण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात अपयशी ठरल्याने प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, बंधाऱ्याच्या बाजूने आवश्यक ती संरक्षक भिंत, दगडी पॅकिंग व माती धूप रोखण्यासाठीची उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. काम पूर्ण झाल्यानंतरही योग्य तपासणी न करता घाईघाईत बिले काढण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. पावसाचे पाणी वेगाने वाहू लागल्याने बंधाऱ्यालगतची माती सरकली आणि काही क्षणातच शेतातील सुपीक जमीन वाहून गेली.
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे पिकांचे नुकसान झाले असून पुढील हंगामातील शेतीही धोक्यात आली आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यावर आता नव्या संकटाचे सावट आले आहे. “बंधारा आमच्यासाठी वरदान ठरेल, अशी अपेक्षा होती; मात्र पहिल्याच पावसात तोच शाप ठरला,” अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्याने व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असून, अशा निकृष्ट कामांमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
आम्ही त्या ठेकेदाराला बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी माती भराव तसेच दगड गोटे टाकून सुस्थितीत करून देण्यास सांगितले आहे व यासाठी होणारा खर्च हा स्वतः ठेकेदारांनी करायचा आहे या सर्व गोष्टींसाठी शासन जबाबदार राहणार नाही.एम.बी.साठे, उप अभियंता