

महाड : महाड नगरपालिका निवडणुकीत विजयासाठी शिवसेनेने जी रणनिती आखली त्यामुळे प्रथमच पालिकेवर भगवा फडकला. नगराध्यक्षपदी सुनील वसंत कविस्कर यांची निवड झाल्याने शिवसेनेच्या मार्फत करण्यात आलेली या निवडणुकीतील रणनीती यशस्वी झाल्याचेच हे स्पष्ट उदाहरण आहे. तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर शिवसैनिकांची नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याची इच्छा फलदरूप झाल्याचे पहावयास मिळते.
मागील तीन दशकांपासून शिवसेनेकडून होणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठी ताकद पणाला लावली जात होती मात्र मागील काही वर्षात शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा परिणाम म्हणून नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मागील वेळेला काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांच्या बाजूने गेला होता. त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. गेल्या नऊ वर्षात सावित्री काळ गांधारी नदीपात्रातून वाहून गेलेल्या पाण्याबरोबर राजकारणात झालेली मोठी अदलाबदल शिवसेनेच्या या ऐतिहासिक करिश्माला कारणीभूत ठरली आहे.
महाडच्या बदललेल्या समीकरणांमध्ये पूर्वीच्या 17 नगरसेवकांमध्ये तीन ते वाढवून यावेळी 20 नगरसेवक महाडकर नागरिकांनी निवडून दिले यापैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादी व भाजपच्या बाजूने तर आठ शिवसेना संघटनेच्या वतीने विजयी झाले आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी - भाजप युतीच्या 12 विजय उमेदवारांची अंतिमविजयी आकडेवारी ही सुमारे 12,500 च्या दरम्यान आहे. याउलट शिवसेनेच्या आठ उमेदवारांनी पंधराशे पेक्षा जास्त मतदान या विजयी फरकातून प्राप्त केल्याचे दिसून येते.
सुनील कविस्कर यांनी प्राप्त केलेला नगराध्यक्ष पदाचा 692 मतांचा हिशोब करता त्यांच्या स्वतःच्या प्रभाग चार मध्ये त्यांना 391 तर लगतच्या प्रभागांमध्ये त्यांना 233 मतांचे मताधिक्य प्राप्त झाले होते. या दोन प्रभागातूनच त्यांना मिळालेले मताधिक्य अन्य ठिकाणी कमी करण्यात सुदेश कलमकर यांना अपयश आल्यानेच त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागण्याचे चित्र स्पष्ट झाले.
मंत्रीपदाचा विनियोग शहरविकासासाठी
मागील सुमारे चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपली सगळी राजकीय चातुर्यता पणाला लावून सुमारे 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी महाडच्या विविध समस्या पूर्ततेसाठी आणला. याचा परिणाम महाडकर मतदारांवर होऊन मतदारांनी या वेळेला शिवसेनेच्या पारड्यात मतदान झाल्याचे दिसून येते. उलट 2021 च्या महापुरादरम्यान व त्यापूर्वी असलेल्या कोरोना महामारीमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष स्नेहल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच स्वर्गीय माणिकराव जगताप यांनी केलेल्या कामगिरीची योग्य पद्धतीने जनतेसमोर जाऊन करण्यात यावेळी त्यांना अपयश आल्याचे दिसून येते.