Whale Vomit Smuggling Pudhari
रायगड

Whale Vomit Smuggling: पणदूरमध्ये अंबरग्रीस तस्करीचा ‘डील’ फसले! २.३७ कोटीची २ किलो ३७३ व्हेलची उलटी जप्त

चौघांवर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ: प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटी (अंबरग्रीस) तस्करीचा पर्दाफाश करत एलसीबीने कुडाळ-पणदूर परिसरात सुमारे २ किलो ३७३ ग्रॅम अंबरग्रीस जप्त केले. आंतराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्थानिक चौघांना ताब्यात घेतले बसून त्यांच्यावर कुडाळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच तस्करीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि कारसह पोलिसांनी एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई शनिवार २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा करण्यात आली.

या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील अंबरग्रीस तस्करीचे कनेक्शन पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. एलसीबीचे पथक कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना काही व्यक्ती प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटी सदृश पदार्थाची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी पणदूर-कडावल रस्त्यालगत पणदूरतिठा नजिकच्या वळणावर सापळा रचला. यावेळी पंच, वजनकाटाधारक आणि वनरक्षक यांच्या उपस्थितीत कारवाईची तयारी करण्यात आली.

काही वेळातच काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल आणि ग्रे रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा अशी दोन वाहने तेथे आली. पोलिसांनी दोन्ही वाहनांची व आतील व्यक्तींची तपासणी केली असता त्यांच्याकडील सॅकमध्ये लपलेला २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचा अंबरग्रीस आढळून आला.

या प्रकरणी संकेत संतोष चव्हाण (२६, रा. रवळनाथनगर, ओरोस, मूळ रा. निरूखे), महेश लक्ष्मण रेवणकर (३५, सध्या रा. कुवारबांव, रत्नागिरी, मूळ रा. रेवंडी, मालवण), अमेय पुंडलिक देसाई (३१, रा. रवळनाथनगर, ओरोस) आणि अमित अरुण अणावकर (३९, रा. अणाव, कुडाळ) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंचनामा करून अंबरग्रीस व कार असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद एलसीबीचे पोलीस काॅन्स्टेबल अमर कांडर यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ मधील कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८ आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करीत चौघांनाही अटक करण्यात आली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अति. पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अनिल हाडळ, उपनिरीक्षक हनुमंत भोसले, उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, आशीष जामदार आणि कॉन्स्टेबल अमर कांडर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबतचा तपास कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिरूद्ध सावर्डे करीत आहेत.

तस्करीमागे मोठे रॅकेट?

अंबरग्रीस पदार्थाचा हा साठा नेमका कोठून आणण्यात आला, तो कोणाला विक्री केला जाणार होता, तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यामुळे चौघांच्या चौकशीतून तस्करीच्या या व्यवहारामागील साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT