Raigad Tourism Pudhari
रायगड

Raigad Tourism| मांडवा ते श्रीवर्धन : निळ्याशार सागर किनाऱ्यांचे टुरिस्ट सर्किट; 115 कि.मी. अंतराचा सागरी पट्टा आकर्षण

कोकणचा समुद्रकिनारा म्हणजे निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे.

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: कोकणचा समुद्रकिनारा म्हणजे निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. त्यातील विशेषतः रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मांडवापासून सुरू होऊन श्रीवर्धनपर्यंत पसरलेला हा 115 कि.मी. अंतराचा सागरी पट्टा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. अथांग समुद्र, चंदेरी वाळू, नारळ-सुपारीच्या बागा आणि ऐतिहासिक गड-किल्ले अशा विविधतेने नटलेला हा प्रवास कोणत्याही पर्यटकासाठी अविस्मरणीयच ठरतो.

मांडवा : किनारी पर्यटनाचे प्रवेशद्वार

मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांसाठी अलिबाग तालुक्यातील मांडवा हे मुख्य प्रवेशद्वार आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून कॅटमरान आणि बोटीने पर्यटकांना अवघ्या 40 मिनिटांत मांडव्याला पोहोचता येते. रो-रो बोटसेवा सुविधेमुळे आता पर्यटकांना स्वतःच्या वाहनासह मुंबईतून थेट मांडव्यात येणे सोपे झाले आहे.

अलिबाग : पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र

अलिबागचा मुख्य समुद्रकिनारा आणि समुद्रात डौलाने उभा असलेला कुलाबा किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्यातील श्री गणेश पंचायत गणेश मंदिर आणि गोड्या पाण्याची विहीर आजही सुस्थितीत आहे. अलिबाग किनारी बनानाराईड, वॉटर स्कूटर, एटीव्ही असे वॉटरस्पोर्टस्‌‍ देखील आहेत.

रेवदंडा आणि चौल : इतिहासाच्या पाऊलखुणा

अलिबागकडून पुढे निघाल्यावर पहिले गाव लागते ते आक्षी. या गावात मराठी भाषेतील सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचा मराठी भाषेतील शिलालेख आहे. पुढे नागावचे सुरूचे बन आणि निसर्ग रमणीय किनारा चित्ताकर्षक आहे. चौल येथीलनारळी-फोफळीच्या बागा आणि त्यात दरवळणारा सोनचाफा आणि जायफळ हे अनुभवण्याचा आगळा आनंद असतो.

काशीद समुद्र किनारा

पांढरी शुभ्र वाळू व निळेशार पाणी यामुळे काशीद समुद्रकिनाऱ्याला मिनी गोवा म्हटले जाते. दोन टेकड्यांच्या मधील हा किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरतो.

मुरूड-जंजिरा : अभेद्य जलदुर्ग

समुद्रात मध्यभागी असलेला जंजिरा हा अजिंक्य जलदुर्ग पाहता येतो. शिडाच्या बोटीने किल्ल्यापर्यंत जाण्याचा प्रवास थरारक आणि तितकाच आनंददायी असतो. मुरूडमध्येच असलेले फणसाड अभयारण्य शेकरूया उडत्या खारीच्या अधिवासाकरिता सुप्रसिद्ध आहे.

निसर्गरम्य श्रीवर्धन ः मांडवा ते श्रीवर्धन टुरिस्ट सर्किट या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात श्रीवर्धन हे महत्त्वाचे केंद्र आहे. मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांचे हे जन्मठिकाण. येथील समुद्रकिनारा अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT