कोकणातील सागर किनारे पर्यटकांनी फूलू लागले 
रायगड

Raigad News : कोकणातील सागर किनारे पर्यटकांनी फूलू लागले

नाताळ, नववर्ष स्वागतासाठी बुकींग होतेय हाऊसफूल

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड : कोकणातील निसर्ग रमणीय समुद्र किनारे हे सातत्याने पर्यंटकांना भूरळ घालणारे असेच आहेत. त्याच बरोबर कोकण किनारपट्टीतील ऐतिहासीक मंदिरे, सागरी किल्ले आणि सर्वात महत्वाचे विविध प्रकारचे मासे हे पर्यंटकांना कोकणात अगदी खेचून आणतात. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांच्या किनारीभागात अगदी समुद्रास लागून गेल्या 10 ते 12 वर्षात निर्माण झालेली पर्यटकांसाठीची घरगुती निवारा व्यवस्था, कॉटेजेस, हॉटेल्स यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या 10 वर्षांत विक्रमी वाढ झाली आहे. यंदा देखील कोकणातील सागरकिनारे पर्यटकांनी फुलू लागले असून आगाऊ बुकींग फूल होत असल्याचे पर्यंटन व्यावसायिकांनी सांगीतले.

दरम्यान कोकणात आलेल्या या एकूण पर्यटकांपैकी सर्वाधीक पर्यटक डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या निमीत्ताने आले होते. गेल्या 10 वर्षांत कोकणात येणाऱ्या पर्यटकांमध्ये फॅमिली टूरिझम अर्थात सहकुटूंब पर्यटन आणि गृप टूरिझम अर्थात समुह पर्यटन या दोन संकल्पना अधिक दृढ होताना दिसून येत असल्याचा निष्कर्श अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार निमिष परब यांनी सांगीतले.

अटलसेतू, सागरी रो-रो सेवांमुळे पर्यटकांचा प्रवास गतीमान

अटल सेतू आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणातील जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळाली आहे. मुंबई येथील पर्यटक थेट कोकणात पोहोचत आहेत. मुंबईतून रो रो सेवेने आपल्या वाहनांसह थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येत असून पूढे जंगल जेट्टींच्या माध्यमातून थेट रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांना पोहोचता येते. हा प्रवास संपुर्णपणे समुद्र किनाऱ्यांनी असल्याने अत्यंत आल्हाददायक असाच असून तो पर्यंटकांना भावतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे, येथील पर्यटनाला पर्यटकांची विशेष पसंती आहे.

कोल्हापूर, सांगली आदि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यंटकांची संख्या येथे मोठी आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांत कोकणातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. फक्त नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष स्वागताकरिता येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून, कोकणातील पर्यटन व्यवसायात 40 ते 45 कोटी रुपयांची उलाढाल गतवर्षी झाल्याचा अंदाज कोकणातील पर्यंटन संस्थांचा आहे. यंदा यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज देखील परब यांनी व्यक्त केला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील बहुतांश पर्यटन स्थळे वर्षअखेरीस पर्यटकांनी अगदी भरुन जातात. कोकणातील पर्यटकांचे आकर्षण केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित नसून, विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमुळे त्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर आणि सुंदर समुद्रकिनारा भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. आरे-वारे येथील दुहेरी किनारा तर दापोली येथील हिल स्टेशन आणि नारळी फोफळीच्या बागा पर्यंटकांचे आकर्षण आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील स्वच्छ पाणी आणि स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगची सुविधा युवा पर्यटकांना भुरळ पाडते. सिंधुदुर्ग ऐतिहासिक जलदुर्ग हे मोठे आकर्षण आहे. आंबोली हे पर्यंटकांच्या पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, आवास, सासवणे, किहिम, काशीद, मुरुड हे समुद्र किनारे मुंबई-पुण्यापासून जवळ असल्याने हे नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. मुरुड जंजिरा किल्ला आणि त्यावर जाण्याकरिता शिडाच्या बोटील प्रवास पर्यंटकांचा आवडीचा भाग आहे.

पर्यटन विकासाला आता केंद्र सरकारच्या उद्यम आधारची साथ

आता पर्यंत पर्यटक संख्या आणि पर्यटन उलाढाल याची आकडेवारी नेमकी सांगता येत नव्हती मात्र आता केंद्र सरकारच्या उद्यम आधार योजनेंतर्गत कोकणातील लहानमोठे सर्व पर्यटन व्यावसायिक यामध्ये नोंदणीकृत होत आहेत. या याजनेतून पर्यटन व्यावसायिकांना व्यावसायिक कर्जे देखील उपलब्ध होणार आहेत. परिणामी आता आलेल्या पर्यंटकांची आकडेवारी (डेटा) येत्या काळात सहज उपलब्ध होवू शकणार असल्याचे परब यांनी सांगीतले.

गतवर्षभरात सुमारे दोन कोटी पर्यंटकांनी केले कोकण पर्यटन

कोकणात नेमके किती पर्यटक आले याची संख्या शासन दरबारी उपलब्ध नसली तरी विविध पर्यटन संस्थांच्या सर्वेक्षणातून उपलब्ध आकडेवारी नुसार कोकणात गेल्या वर्षी 2024 मध्ये तब्बल 1 कोटी 97 लाख पर्यटकांनी भेट दिली. त्यांतील सर्वाधिक 60 लाख पर्यटक संख्या पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आहे. उरर्वरित जिल्ह्यात रायगड मध्ये 54 लाख, रत्नागिरीमध्ये 43 लाख तर ठाणे पालघर मध्ये 40 लाख पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT